जलजीवन मिशन योजनेत सरपंचांचे अधिकार कायम न ठेवल्यास आंदोलन : सरपंच सेवा महासंघाच्या अध्यक्षा निता गोवर्धने

 

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ – जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरात पाणी पोहचविण्यासाठी केंद्र शासनाचे ध्येय आहे. यासाठी अतिदुर्गम भागात पारदर्शक योजना राबविण्यासाठी सरपंच महत्वाचे असतात. मात्र ह्यामध्ये हस्तांतरित करण्याचे अधिकार सरपंचांकडून काढण्याचा निर्णय घेतल्याने इगतपुरी तालुक्यातील सरपंचांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पाणी योजनेची कामे पूर्ण झाल्यानंतर योजना हस्तांतरित करण्याचे सरपंचांचे अधिकार काढून घेतल्याने तालुक्यातील सरपंच आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. सरपंचांचे अधिकार कायम ठेवावे अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा इगतपुरी तालुका सरपंच सेवा महासंघाच्या अध्यक्षा तथा सांजेगाव सरपंच निता गोवर्धने यांनी दिला आहे.

इगतपुरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये जलजीवन मिशन योजना सुरू असून ७६ पैकी ५० कामे प्रगतीपथावर आहेत.  काम सुरु होण्याच्या प्रतीक्षेत २६ कामे आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांना आदेश, कार्यारंभ आदेश, अंदाजपत्रक अद्यापही दाखवण्यात आलेले नाही. तालुक्यात आधीच योजना पूर्ण झाल्याचे दाखवण्यात येत आहे. त्याचे परिणाम गाव पातळीवर दिसतात. जलजीवन योजनेत ठेकेदार मनमानी कारभार करतात. त्यावर वचक ठेवण्याचे काम सरपंच करीत असतात. मात्र त्यांचे अधिकार काढल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. जोपर्यंत ग्रामपंचायतीकडे योजना हस्तांतर होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचे बिल अदा करू नये अशी मागणीही सरपंच निता गोवर्धने यांच्यासह तालुक्यातील सरपंचानी केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!