महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्य तथा माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या हस्ते क्रिकेट टफचा उद्या शुभारंभ ; मोडाळे येथील अभ्यासिकेतही करणार मार्गदर्शन : नागरिकांनी उपस्थित राहण्याचे गोरख बोडके यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 11

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी मोडाळे गावाला राज्याच्या नकाशावर झळकवण्याचा विडा उचलेला आहे. त्यानुसार त्यांच्या नियमित मार्गदर्शनाने मोडाळे गावात विविध विकासकामे झालेली आहेत. गावासह सर्व युवकांना उपयुक्त ठरणाऱ्या क्रिकेट टफची निर्मिती पूर्ण झाली आहे. पूर्णपणे मोफत असणारा हा उपक्रम नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने उभारलेला पहिलाच भव्य उपक्रम आहे. मोडाळे ह्या अतिदुर्गम भागातील ग्रामपंचायतीने उभारलेल्या क्रिकेट टफचा शुभारंभ उद्या शनिवारी 12 नोव्हेंबरला होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य तथा माजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र प्रताप दिघावकर यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता उदघाटन होईल अशी माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी दिली.

स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विविध ग्रंथसंपदा आणि सुसज्ज व्यवस्था असणारी अभ्यासिका यापूर्वीच खुली करण्यात आलेली आहे. त्या सुविधेचा फायदा शेकडो विद्यार्थी नियमित घेत आहेत. ह्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य तथा माजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र प्रताप दिघावकर यांचे अनमोल मार्गदर्शन यावेळी मिळणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोरख बोडके यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!