इगतपुरीनामा न्यूज, दि. 14
प्राणवायूच्या कमतरतेमुळे इगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या श्वासांची घुसमट होतेय. अशावेळी विविद्य क्षेत्रातील नागरीक मदतीसाठी आपल्या शक्तीप्रमाणे कार्य करत आहेत. असे असतांनाही इगतपुरी तालुक्यात मदतीची शक्ती असणारी माणसे पुढे आलेली नाहीत. काल परवा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी स्वखर्चाने ऑक्सिजन निर्मित कटणारे 2 स्वयंचलित यंत्र दोन्ही कोविड सेंटरच्या रुग्णसेवेसाठी भेट दिले. यामुळे अनेक रुग्णांचा बहुमोल प्राण वाचणार आहे. आज तर ह्याही घटनेच्या पलीकडे अभूतपूर्व काम गोरख बोडके यांनी केलं आहे. सातपूर येथील स्वमालकीच्या अभिषेक एंटरप्राइज कारखान्याला बंद करून कारखान्यातील 4 ऑक्सिजन सिलेंडर इगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा अर्पण केले आहेत. अद्यापही इगतपुरी तालुक्यातील नागरिकांनी पुढे येऊन ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन यंत्र आदी सामुग्रीसाठी आपले योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिरसाठे जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके हे आपत्ती काळात नेहमीच अग्रस्थानी राहून काम करतात. गेल्या 5 वर्षापासून नाशिकच्या सातपूरमध्ये त्यांच्या मालकीचा अभिषेक एंटरप्राइज नावाचा कारखाना आहे. ह्या कारखान्यात दैनंदिन कामासाठी वापरले जाणारे 4 ऑक्सिजन सिलेंडर आहेत. त्यांनी स्वतःचा कारखाना काही काळ बंद करून तिथले 4 ऑक्सिजन सिलेंडर इगतपुरी ग्रामीण रुग्णालय आणि कोरपगाव कोविड सेंटरला आज समर्पित केले. त्यामुळे अनेकांचा प्राण वाचवायला मोठी मदत मिळणार आहे. इगतपुरी तालुक्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन आणि बेडची समस्या निर्माण झाल्याचे दिसते आहे. ह्या पार्श्वभूमीवर गोरख बोडके यांनी साक्षात देवदूत बनून यापूर्वी आणि आज केलेली मदत ऐतिहासिक असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. गोरख बोडके यांनी 2 दिवसात केलेल्या भरीव मदतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तालुक्यातील नागरिकांनी पुढे येण्याची गरज
सध्याचा काळ इगतपुरी तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत कसोटीचा काळ आहे. भल्या भल्या श्रीमंतांना ऑक्सिजन आणि बेडअभावी गयावया करतांनाचे चित्र दिसते आहे. अशा काळात सामाजिक जाणीव आणि मानवी संवेदना जपणारे गोरख बोडके सध्यातरी एकमेव आहेत. अजूनही इगतपुरी तालुक्यात भरघोस मदतीची शक्ती असणारे अनेक शक्तीस्थाने आहेत. ह्या शक्तीस्थानांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन यथाशक्ती मदत करावी अशी अनेक रुग्णांची अपेक्षा आहे.