श्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25

श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरीचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. सामाजिक न्याय विभागाकडून कर्ज व वस्त्रोद्योग विभागाच्या भागभांडवलामधून यंत्रसामुग्री खरेदी केली जाईल. पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी ही सूतगिरणी उत्पादनाखाली आणण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री विनय कोरे ( सावकार ) यांनी व्यक्तिशः लक्ष घालून आवश्यक मदत करण्याचे अभिवचन दिले असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू यांनी केले. शेकडो लोकांना रोजगार देण्यासाठी ही सूतगिरणी मैलाचा दगड ठरेल असेही ते म्हणाले.

श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरी या संस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली. यावेळी डॉ. अशोकराव माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून सूतगिरणीबाबत माहिती सांगितली. संस्थेच्या चेअरमन डॉ. नीता अभिजित माने सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उद्योगपती किरण मेहता, निवृत्त पोलीस उपअधीक्षक विलास भोसले, कोकण रेल्वेचे माजी मुख्य अभियंता दीपक दिवटे यांनी मनोगत व्यक्त केले. विषय पत्रिका वाचन संस्थेचे कार्यकारी संचालक सुहास राजमाने यांनी केले. सभासदांनी हात उंचावून सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. सभेप्रसंगी रेखा माने, व्हॉइस चेअरमन संघमित्रा गजरे, संचालिका रजनी रोकडे, सुनीता चव्हाण, रुपाली राजमाने, कु. श्रेयष्टी सोनवणे, अश्विनी गायकवाड, शिल्पा रोकडे, विद्या सोनवणे, संपदा गजरे, सारिका अरविंद माने, स्नेहा शिरवळकर, शुभांगी रोकडे, शारदा शिरवळकर, वास्तुविशारद श्रीकांत पाटील, ठेकेदार संदीप हवाने, वैभव इंगळे यांच्यासह महिला सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!