इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
सध्या नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या काही टोळ्या फिरत असल्याची अफवा पसरली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.
सोशल मीडियामध्ये कधी काय पसरेल याची काहीही सांगता येत नाही. अशीच एक अफवा सध्या सोशल मीडियावर पसरली असून यामध्ये काही परप्रांतीय नागरिक लहान मुलांना पळवून नेत असल्याचे म्हटले आहे. मात्र कुणीतरी खोडसाळपणा करण्यासाठी मुद्दाम ही अफवा पसरवली असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशी एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.
ग्रामीण भागात या अफवा रोजच नवनवीन काल्पनिक गोष्टी घेवून नव्याने पसरते आहे, या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुलांना घराबाहेर पाठवण्यासाठी पालक तयार नसून मुलांच्या शाळेतील उपस्थिती वर सुध्दा याचा काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसत आहे. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अशी कुठलीही घटना घडली नसून संपूर्ण जिल्ह्यात लहान मुलांसह सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये, कुणी तसा प्रयत्न केल्याचे आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही केले आहे.