इगतपुरीनामा न्यूज, दि. 22
इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव ह्या गावात अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नाही. सांजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या या गावात उघड्यावर अंत्यसंस्कार होत असल्याने मृत व्यक्तीला धड अंतिम क्रियाकर्म सुद्धा नशिबी नसल्याचे दिसते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी कायमस्वरूपी स्मशानभूमी बांधकामासाठी पाठपुरावा करण्याची जुनी मागणी आहे. या गावात गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी स्मशानभूमी नाही. परिणामी गावात अनेक वर्षांपासून होणारे सर्व अंत्यसंस्कार उघड्यावरील जागेवर होत आहेत. या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस आणि सुसाट्याचा वारा असल्याने या काळात होणारे अंत्यविधी सर्वांना जिकिरीचे ठरतात. सततच्या पावसाचे पाणी चितेवर जाऊन सतत चिता शांत होत असते. परिणामी प्रेताला पुन्हा वाहनांचे टायर आणि प्लास्टिक जाळून कसेबसे जाळावे लागते. गेली अनेक वर्षे स्मशानभूमीचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. मोठे पर्जन्यमान असणाऱ्या ह्या भागात पावसाळ्यात होणारे अंत्यसंस्कार अतिशय त्रासदायक ठरतात. या काळात पुन्हा हा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामस्थ चर्चा करतात. अद्यापही या प्रकरणी काही तोडगा निघालेला नाही. किमान अंतिम संस्कार तरी सुखाचे व्हावे यासाठी या गावात स्मशानभूमीचा प्रश्न कायस्वरूपी सुटणे अत्यावश्यक आहे. ह्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संबंधित प्रशासनाने प्रयत्न करावे अशी सर्वांची अपेक्षा आहे