इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणी इगतपुरी वन विभागाने जोरदार तपास सुरु केला आहे. संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या राहत्या आदिवासी पाड्यावर जाऊन सखोल तपास करण्यात आला. त्यामध्ये चिंचतारा ता. मोखाडा, जि. पालघर ह्या गावाच्या शिवारातील जंगलात खोदकाम करत बिबट्याची दडवून ठेवलेली अन्य अवयव व हाडे जप्त केली. दरम्यान मृत झालेला बिबट्या व हाती लागलेली त्याची कातडी आणि सापडलेली हाडे एकाच बिबट्याची आहेत का हे निष्पन्न करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविले येणार आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाने बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात प्रकाश लक्ष्मण राऊत वय 43 रा. रांजनवाडा ता. मोखाडा जि. पालघर, परशराम महादू चौधरी वय 30 रा. चिंचतारा ता. मोखाडा जि. पालघर, यशवंत हेमा मौळी वय 38, हेतू हेमा मौळी वय 38 दोघे राहणार रा. कुडवा ता. मोखाडा जि. पालघर या चौघा संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तपास करण्यासाठी संबंधितांना कोठडी मिळालेली आहे. सखोल तपास कामामध्ये इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, शैलेश झुटे, पोपट डांगे, सचिन दिवाने, वाहनचालक मुज्जू शेख आदींनी सहभाग घेतला.