इगतपुरीनामा न्यूज, दि. २
घोटी येथे दशनाम गोसावी समाज मोठ्या संख्येने वास्तव्य करीत असून परंपरेनुसार समाजात मृत झालेल्या व्यक्तीस अग्नीडाग न देता समाधी पद्धतीने अंत्यविधी केला जातो.अशा परिस्थितीत मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास मृत व्यक्तीला समाधी देण्याची जागा शोधण्यासाठी अथक परिश्रम होतात. प्रसंगी वेळेत जागा उपलब्ध न झाल्यास अंत्यविधी संस्कार लांबणीवर पडून मृत व्यक्तीची हेळसांड होते. यामुळे संबंधित कुटुंबाला मानसिक मनस्तापाला सामोरे जावे लागते. गोसावी समाजाला अंत्यविधी आणि समाधीसाठी घोटी येथे जागा मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट घेण्यात येणार आहे.
आधीपासून दशनाम गोसावी समाज हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून उदर निर्वाहाचे साधन म्हणून भिक्षुकीच्या माध्यमातून आपली उपजीविका करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दशनाम गोसावी समाजाकडे हक्काचा निवारा, हक्काची नोकरी नाही. मृत झाल्यास अंत्यविधीसाठी जागा नाही. दशनाम गोसावी समाजाची अवहेलना थांबवण्यासाठी दशनाम गोसावी समाजात मृत होणाऱ्या व्यक्तीच्या समाधीच्या अंत्यविधीसाठी घोटी येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी नाशिक, तहसीलदार इगतपुरी यांना लेखी निवेदन दिले आहे. परंतु अद्याप शासनाद्वारे कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात जातीने लक्ष घालून दशनाम गोसावी समाजाला अंत्यविधीसाठी घोटी येथे जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी समाजाकडून करण्यात येत आहे