साकुर फाटा ते वाडीवऱ्हे रस्त्यावरील मोऱ्या, पूल यांची नवनिर्मिती करून खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी : साकुरचे सरपंच विनोद आवारी आणि ग्रामस्थांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील साकुर परिसरातील काही दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत अस्तित्वात असलेल्या विविध मोऱ्या आणि छोटे पूल कालबाह्य झाल्याने अतिरिक्त पावसाच्या पाण्याने ते कोलमडून गेले आहेत. परिणामी पावसाचे पाणी शेतांमध्ये जाऊन शेतीचे नुकसान करत आहे. यासह मोऱ्या, पूल यांना नुकसान होऊन महत्वाच्या रस्त्यांची सुद्धा वाट लागली आहे. अशी परिस्थिती इगतपुरी तालुक्यातील साकुर भागात मोठ्या प्रमाणावर असल्याने संबंधित बांधकाम विभागाने नव्या मोऱ्या, नवे पूल यांची निर्मिती करून खचलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी साकुरचे सरपंच विनोद आवारी, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाणे आणि ग्रामस्थांनी केली आहे.

एसएमबीटी रुग्णालय, सिन्नर, शिर्डी आणि महत्वाच्या भागाला जोडणारा साकुर फाटा ते वाडीवऱ्हे हा रस्ता आहे. दरवर्षी पावसामुळे या रस्त्याला अनेक प्रकारची ग्रहण लागतात. यामुळे ह्या रस्त्याने प्रवास करणारे नागरिक कंटाळले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. बांधकाम खात्याने मोऱ्या, पूल आणि रस्त्यांच्या निर्मितीकडे लक्ष घालून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.
- विनोद आवारी, सरपंच साकुर

साकुर येथील आमराई मळ्याजवळ राज्य मार्ग साकुर फाटा ते वाडीवऱ्हेकडे जाणारा रस्ता पाणी उलटल्याने मोठ्या प्रमाणावर खचला आहे. याठिकाणी पाईपचा वापर केलेली मोरी असल्याने प्रत्येक पावसात पाणी रस्त्यावरून उलटते. यामुळे प्रत्येक वर्षी हा रस्ता खचतो. यासाठी जुनी मोरी काढुन त्या ठिकाणी छोटा पुल उभारणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या रस्त्यावरील पूल, मोऱ्या यांचे परीक्षण करून सध्याच्या बदलत्या काळाप्रमाणे त्यामध्ये आवश्यक दुरुस्त्या आणि बदल करण्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे. इगतपुरीच्या संबंधित बांधकाम खात्याने याबाबत तातडीने लक्ष घालून महत्वाच्या विषयावर निर्णय घ्यावा, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी साकुरचे सरपंच विनोद आवारी, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाणे आणि ग्रामस्थांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!