नवीन कसारा घाटात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

मुंबई आग्रा महामार्गावरील मुंबईला जाणाऱ्या नवीन कसारा घाटात एका ट्रकने केळी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला धडक दिल्याने भिषण अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावर केळींचा सडा पाहावयास मिळाला. या अपघातात एक जण ठार झाला असुन या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याचे पहावयास मिळाले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम, कसारा पोलीस व महामार्ग सुरक्षा पोलीसांनी धाव घेऊन काही वेळाने वाहतुक सुरळीत केली.

अधिक माहिती अशी की, आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास कसारा घाटात अपघात झाल्याची माहिती मिळाली असता आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य प्रकाश शिंदे व देवा वाघ हे तात्काळ नवीन कसारा घाटातील धबधबा पॉईंटवर पोहचले. अपघात भीषण असल्याने 108 रुग्णवाहिकेला कॉल देत ती बोलवून घेण्यात आली होती. यानंतर महामार्ग पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, दत्ता वाताडे, प्रसाद दोरे, जस्सी भाई, बाळू मागे, अक्षय राठोड, विनोद आयरे यांनी घटनास्थळी दाखल झाले. रात्रीचा अंधार व पाऊस त्यात वळण रस्ता धोकादायक स्थितीत पण महामार्ग पोलीस घोटी केंद्रचे सहायक पोलीस निरीक्षक पवार, खातळे, गोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांसह खासगी क्रेनच्या मदतीने मदत कार्य सुरु केले. एका वाहनाने धडक दिल्याने आयशर टेम्पो एका दरडीवर धडकलेला होता. ज्या ट्रकने धडक मारली तो पण पलटी झालेला होता. आयशर टेम्पो मधील एक जखमी शितल यादव याला अगोदरच प्रकाश शिंदे यांनी बाहेर काढलेले होते. सुमारे दिड ते दोन तासाच्या अथक प्रयत्न अडकलेल्या जखमी चालक पप्पू यादव बाहेर काढले. त्याला 108 च्या डॉक्टरने तपासले असता तो मयत असल्याचे सांगितले. या अपघातामुळे रस्त्यावर केळीचा सडा पडल्याने अनेक दुचाकी स्लीप होताना दिसत होत्या. महामार्ग सुरक्षा पोलीसांनी धाव घेऊन वाहतुक सुरळीत केली.

Leave a Reply

error: Content is protected !!