इगतपुरीनामा न्यूज, दि. १
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले. यामुळे फळविहीरवाडी येथील बंधारा फुटला असून किमान 100 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. भात शेती आणि काही घरांना बंधाऱ्याच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. फळविहीर गावाला जाणारा रस्ता सुद्धा पाण्याखाली गेला आहे. ह्या गावासह परिसरातील गावांनाही पावसाचा मोठा फटका बसला असून शेतीचे खूपच नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने ह्या भागातील शेतीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना युद्धपातळीवर आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी केली आहे. अडसरेचे सरपंच संतू साबळे, ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम कातोरे, रतन बांबळे, हौशीराम कातोरे, सागर साबळे आदींनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा दिला. हरिदास लोहकरे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी लक्ष घालावे अशी विनंती केली. खेड जिल्हा परिषद गटातील सर्व भागात मोठे नुकसान झाले असल्याने सर्व शेतकऱ्यांना भरपाई देण्याची हरिदास लोहकरे यांनी मागणी केली आहे.
सोनोशी व टाकेद परिसरात ढगफुटी सारखा पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे शेतीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे होऊन त्वरित मदत मिळावी.
- रघुनाथ गोडे, शेतकरी सोनोशी