इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
पिंपळगाव बसवंत टोलनाका राज्यभरात कायमच चर्चेत असतो. तालुक्याच्या आमदाराला सुद्धा येथील कर्मचाऱ्यांनी सोडले नसल्याचा विसर कोणालाही पडलेला नाही. अशा स्थितीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या पोलीस अधीक्षक साहेबांना ह्या टोलनाक्याच्या अरेरावीचा आणि मुजोरीचा फटका बसला आहे. यामुळे संतापलेल्या पोलीस अधीक्षक साहेबांनी तातडीने पोलिसांना बोलावून घेत संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. गेल्या आठवड्यात टोल कर्मचाऱ्याने एका दैनिकाच्या उपसंपादकाला बातमी दिली म्हणून दमबाजी केली असल्याची घटना ताजी असताना आता चक्क पोलीस अधीक्षकांची गाडी अडवून त्यांच्यासोबत हुज्जत घालत अरेरावी केल्याची घटना जिल्हाभर पसरली आहे.
पिंपळगाव बसवंत कडून नाशिककडे जाणारे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांचे वाहन टोल नाक्याच्या लेनजवळ आले. मात्र ती लेन बंद असल्याने वाहन दुसऱ्या लेनला गेले. 15 ते 20 मिनिटे होऊनही लेन खुली न झाल्याने पोलीस अधीक्षक साहेबांनी याबाबत विचारणा केली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांचे वाहन जाऊ न देता पोलीस अधीक्षक यांच्याशी हुज्जत घालत अरेरावी केली. त्यामुळे नाईलाजाने संतापून पोलीस अधीक्षक यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्याची संपर्क साधला आणि संबंधित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांच्याशी अरेरावी होत असेल तर सर्वसामान्य माणसाचा रोजचा त्रास किती असेल? अशा यंत्रणेवर वचक निर्माण करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया चांदवडकडे जाणाऱ्या एका वाहनधारकाने दिली.