इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
मोठ्या अधिकारपदावर काम करणारे व्यक्ती सातत्याने महामार्गावरून प्रवास करीत असतात. त्यांच्याकडील वेळेचे नियोजन आणि शून्य संवेदनशीलता यामुळे कोणत्याही अपघातावेळी ते क्षणभर सुद्धा थांबत नाही. नाहक झंझट नको आणि नाहक खिशाला फटका नको हाच दृष्टिकोन अनेकांमध्ये आढळतो. त्यामुळे राजकीय आणि अधिकारी मंडळीकडून क्वचितच मदतकार्याच्या बातम्या येत असतात. याला अपवाद ठरले आहेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ…! अनेकदा ते महामार्गांवर घडलेल्या आपत्तीच्या वेळी आपल्या ताफ्यासह मदतीला थांबले आहेत. त्यांच्या उपस्थितीने मदतीला गतिमानता मिळते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज मुंबईहून नाशिककडे येत असतांना कसारा घाटात अपघात झाल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी तात्काळ अपघातस्थळी थांबून पाहणी केली. अपघाताची तीव्रता अधिक असल्यामुळे वाहनचालकाचा जागीच मृत्यू झालेला होता. अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल याची त्यांनी चाचपणी केली. अपघातात ठार झालेल्या वाहनचालकाच्या नातेवाईकांसोबत तात्काळ त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या. अपघातग्रस्त प्रसंगी मदत कार्य करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन टीमच्या कार्यकर्त्यांची मदत पाहून छगन भुजबळ अत्यंत प्रभावित झाले. मदत करणाऱ्या सहकाऱ्यांची नावे आणि माहिती त्यांनी जाणून घेतली. आपत्ती व्यवस्थापन टीमचे विशेष कौतुक करून आपण पुन्हा भेटू, तुमच्या चांगल्या कार्यासाठी माझे आशीर्वाद आहेत असे ते म्हणाले.