उत्तर महाराष्ट्रातील क्रमांक एकच्या श्री संग्राम गोविंदा पथकाने फोडली ७ थरांची सर्वात उंच दहीहंडी

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

गोकुळाष्टमीला पहाटपासून मानाच्या दहीहंडीची लगबग… अनेक दिवसांचा सराव पूर्णत्वाकडे नेण्यासाठी धडपड… लहानग्यांचा आनंद… गोविंदा गीतांचा तालबद्ध आवाज… कोणताही क्षण न चुकवण्यासाठी डोळे विस्फारलेले मान्यवर… महिला आणि गावकऱ्यांकडून गोविंदांना उत्साह देण्याचे कार्य आणि पर्जन्यराजाची हजेरी अशा ऐटदार सोहळ्याला नाशिक जिल्ह्यासह तालुकाभरातून हजारोंची उपस्थिती लाभली. अन यापूर्वी सर्वाधिक थराचा विक्रम नावावर असणाऱ्या श्री संग्राम गोविंदा पथकाने यावर्षीही ७ थर लावत मानाची दहीहंडी फोडली. इगतपुरी तालुक्याच्या सर्व क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवरांनी ह्या अभूतपूर्व नयनरम्य आणि नेत्रदिपक दहीहंडीचा आनंद लुटला. जागतिक महामारीच्या प्रकोपामुळे गेली काही वर्ष शेकडो गोविंदांच्या आनंदावर पाणी ओतले गेले. यावर्षी मोठ्या दिमाखात गोकुळाष्टमी साजरी करण्यासाठी सगळीकडे अभूतपूर्व उत्साह आहे. यानिमित्ताने नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर ह्या जिल्ह्याच्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे अव्वल असणारे टिटोली ता. इगतपुरी येथील श्री संग्राम गोविंदा पथक ओळखले जाते. मुंबई ठाणे परिसरातील अनेक दहीहंड्या फोडण्याचा विक्रम श्री संग्राम पथकाच्या नावावर आहे.

इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्यातील धडपड्या युवकांनी गेल्या अनेक वर्षापासून श्री संग्राम गोविंदा पथक स्थापन केलेले आहे. गगनभेदी उंचच उंच दहीहंड्या फोडण्याचा विक्रम त्यांनी आज पर्यत केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच असणारे ७ थर लावून सर्वात उंच दहीहंडी फोडण्याचा त्यांचा विक्रम आहे. मानाची दहीहंडी फोडुन उत्सव साजरा केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी डीजे पंचमच्या तालावर तरुणाई थिरकली. इगतपुरीजवळ असलेल्या टिटोली या गावातील जिद्दी युवकांनी पुढे येऊन श्री संग्राम गोविंदा पथक स्थापन केले. सुमारे अडीचशे ते तीनशे युवकाचा या पथकात समावेश असून दही हंडी फोडण्याचा ते केवळ महिनाभर सराव करतात. या झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने, भगवान आडॊळे, विठ्ठल लंगडे, रामदास भोर, रामदास गव्हाणे, ॲड. हनुमान मराडे, हरीश चव्हाण, कैलास कडू, संपत डावखर, योगेश भागडे, शिवचरण कोकाटे, भगीरथ भगत, एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन चित्रपट निर्माते धनराज म्हसणे यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!