देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे माहितही नसणाऱ्या मोडाळे गावात शिक्षणामुळेच अभूतपूर्व प्रगती – गावाचे प्रथम शिक्षक जगन्नाथ फुलदेवरे : अमृतमय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ९० वर्षीय गुरुजनांना ध्वजारोहणाचा सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

६४ वर्षांपूर्वी म्हणजेच १९५८ सालामध्ये अति दुर्लक्षित, अतिदुर्गम, शिक्षणाचा गंध नसलेल्या आणि समाजाने उपहास केलेल्या मोडाळे गावात शिक्षणाची गंगा वाहती करणाऱ्या शिक्षकांच्या हस्ते अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहन करण्यात आले. तत्कालीन काळात अनंत अडचणींवर मात करून शिक्षणाचे बाळकडू पाजणारे गावातील पहिले शिक्षक जगन्नाथ फुलदेवरे यांचे सध्या ९० वर्ष वय आहे. त्यांनी आज सपत्नीक हजर राहून स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणित केला. मोडाळे शाळा स्थापन केल्यानंतर गावाला साक्षर करून आजची दिमाखदार वाटचाल घडवण्यासाठी जगन्नाथ फुलदेवरे यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांच्या पदस्पर्शाने मोडाळे शाळा प्रफुल्लित झाली असल्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन इयत्ता पाचवीचे 80 वर्षीय शिक्षक बाळू गोवर्धने यांना सन्मान मिळाला. कार्यक्रमाप्रसंगी फुलदेवरे परिवाराने शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

जगन्नाथ फुलदेवरे म्हणाले की, १९५८ साली शिक्षक म्हणून हजर झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळून 16 वर्ष पूर्ण झाली असली तरी मोडाळे गावात स्वातंत्र्य मिळाल्याचे ऐकीवातच नव्हते. कमालीचे दारिद्र्य, निरक्षरता, रोजगाराचा अभाव, आरोग्याची हेळसांड अशी अनेक खडतर आव्हाने होती. शिक्षण हेच यावरचे प्रभावी औषध असल्याने आम्ही आमच्यातील कौशल्य पणाला लावून शिक्षणाची आवड निर्माण केली. आज मागे वळून पाहातांना आमचे प्रयत्न सार्थकी लागले असे दिसले. येणाऱ्या काळात ह्या शाळेचे विद्यार्थी जगाच्या नकाशावर नाव नोंदवतील असा विश्वास वाटतो असे ते शेवटी म्हणाले. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा अमृतमय सोहळा संपन्न झाला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!