इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
इगतपुरी येथील कु. कुणाल लुणावत याची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ( सेबी ) या भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्वोच्च संस्थेमध्ये अधिकारी ( गट अ ) सहाय्यक प्रबंधक या पदावर निवड झाली आहे. श्री. ललित व सौ. कविता लुणावत यांचे ते सुपुत्र असून इगतपुरी तालुक्यात लुणावत परिवारावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी कुणाल याची केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स आणि इंटेलिजन्स ब्युरोमध्ये देखील निवड झाली होती. परंतु प्रशासन आणि अर्थव्यवस्था या विषयाकडे कल असल्याने त्याने पुढील तयारी सुरु ठेवली. या यशाचे सर्वच स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही सेबी कायदा १९९२ अन्वये भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाधीन वैधानिक नियामक संस्था आहे. सेबीमध्ये एकूण १२० जागांसाठी संपूर्ण देशातून ७८ हजार ८५ उमेदवारांनी आवेदने केली होती. सेबीच्या त्रिस्तरीय निवड प्रक्रियेमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश असतो. निवड झालेल्या अधिकाऱ्यांना सेबीच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स येथे प्रशिक्षण देऊन सेबीच्या विविध विभागामध्ये नियुक्ती दिली जाते.