लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
अपार कष्ट केलं तर यश हे नक्कीच पायाशी लोटांगण घालतं. मात्र त्यासाठी सतत परिश्रम करणेही तितकेच गरजेचे आहे. नुसते स्वप्न पाहून चालणार नाहीतर तर ते प्रत्यक्षात पूर्ण देखील झाले पाहिजे. जिद्द, चिकाटी आत्मविश्वासाच्या बळावर नाशिक येथील सागर सुरेश मनोरे याने कक्ष अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. एमपीएससी राज्य सेवा आयोगाच्या माध्यमातून मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती
नियुक्ती झाल्याने त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध विभागामार्फत संवर्गातील दोनशे पदांची भरती घेण्यात आली होती. त्यात सागर सुरेश मनोरे याने गुणवत्ता यादीत काही दिवसांपूर्वी स्थान पटकावले होते.
सागरचे बी आयटी शिक्षण झाले असून कोरोनाच्या काळातही मोठ्या मेहनतीने राज्यसेवेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले. त्याचे यश प्रेरणादायी असल्याचे वडील सुरेश मनोरे यांनी सांगितले. त्याच्या वडिलांनी घोटी, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून अतिशय चोख असे काम बजावले असून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. सध्या ते ठाणे येथे पोलीस निरीक्षक असून त्यांनी आपल्या मुलावर योग्य संस्कार केले आहे. सागरच्या यशात आई वडिलांचा मोलाचा वाटा असल्याचे त्याने सांगितले.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला रात्रंदिवस कामे करावी लागतात. घडलेली अनेक गुन्हे, तपास आदी कामे करताना मुला बाळांना वेळ देणे शक्य होत नाही. मात्र एवढे असूनही सागरने स्वतः मेहनतीच्या बळावर राज्यसेवा परीक्षांच्या माध्यमातून कक्ष अधिकारी होऊन आमचे नाव उंचावले याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. भविष्यात त्याच्या हातून गोरगरिबांची सेवा घडो.
- सुरेश मनोरे, पोलीस निरीक्षक ठाणे ग्रामीण