इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
सरकारी कार्यालयांचा बेधुंद कारभार आणि सामान्य नागरिकांना त्रस्त करण्याचे प्रकार आपण सगळीकडे अनुभवत आलो आहोत. ह्यातच दिव्यांग आणि अंध नागरिक असेल तर विचारूच नका…! त्यामुळे शासकीय कार्यालयाची पायरी चढतांना सामान्य माणूस बराच धास्तावलेला असतो. ह्या सर्व समजुतीला फाटा देत इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी अंध दाम्पत्याला त्वरेने दखल घेऊन अंत्योदय योजनेची पिवळी शिधापत्रिका दिली आहे. पत्रकार भास्कर सोनवणे, वाल्मिक गवांदे आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष सपन परदेशी यांच्या माध्यमातुन टिटोली येथील अंध जोडपे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना भेटले. त्यांच्या व्यथा समजून ह्या “परमेश्वराने” तातडीने कार्यवाही करून कागदपत्रांची योग्य ती पूर्तता करून घेतली. शिधापत्रिका तर मिळाली आहेच. पण लवकरच ह्या दाम्पत्याला संजय गांधी योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे. देवमामलेदार महाराज हे नाव आधी ऐकले होते मात्र साक्षात देवमामलेदार “परमेश्वर” रुपात आज भेटल्याची प्रतिक्रिया अंध दिव्यांग केतन भटाटे, वृषाली भटाटे यांनी दिली.
दिव्यांग बांधवांसाठी शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार योग्य ती कार्यवाही करून नियमाप्रमाणे त्यांना शिधापत्रिका दिली. वेळेत आणि तत्पर काम होण्यासाठी व्यक्तिशः लक्ष घातले. आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी जनतेचे काम करण्यासाठी नेहमीच बांधील आहोत.
- परमेश्वर कासुळे, तहसीलदार इगतपुरी
बऱ्याच दिव्यांगांना आजही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जगण्याची लढाई लढण्यासाठी अनेकदा समाजासोबत झुंज द्यावी लागते. यातच शासकीय योजनांसाठी सरकारी बाबूंच्या बेफिकिरी प्रवृत्तीचा लढा सुद्धा द्यावा लागतो. हे सगळं करतांना बरेच जण कंटाळून विषय सोडून देतात. ह्या सगळ्या गैरसमजुतीला धक्का देण्याचे काम इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे. टिटोली येथील १०० टक्के अंध असणारे केतन आणि वृषाली भटाटे यांना विविध शासकीय योजनांसाठी शिधापत्रिका आवश्यक होती. त्यांनी याबाबत पत्रकार भास्कर सोनवणे, वाल्मिक गवांदे आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष सपन परदेशी यांची मदत मागितली. या सर्वांनी ह्या जोडप्याला तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे नेऊन समस्यांचा पाढा वाचला. श्री. कासुळे यांनी तातडीने कार्यवाही करून नियमाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करून घेतली. यानंतर ह्या जोडप्याला लगेचच पिवळ्या रंगाची अंत्योदय योजना शिधापत्रिका वितरण करण्यात आली. आमच्यासाठी धावून आलेले “परमेश्वर” असणाऱ्या तहसीलदार साहेबांच्या हस्ते आम्ही शिधापत्रिका स्वीकारू अशी भूमिका भटाटे दाम्पत्याने घेतली. त्यांचा लाडिक आग्रह तहसीलदार कासुळे यांना मोडता आला नाही. ह्याकामी पुरवठा विभागाच्या अव्वल कारकून मोहिनी पगारे यांचेही साहाय्य लाभले. लवकरच ह्या जोडप्याला संजय गांधी योजनेचाही लाभ दिला जाणार आहे.
आमच्या दिव्यांग बांधवांसाठी तहसीलदार परमेश्वर कासुळे हेच “देवमामलेदार” आहेत. त्यांच्या समयसुचकतेमुळे अंध दाम्पत्याला “प्रकाश” मिळण्याला मोठी मदत झाली. परमेश्वर कासुळे यांचे सर्व दिव्यांगांच्या वतीने आम्ही आभार मानतो.
– सपन परदेशी, उपाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना