इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
सिहांसनाधीश्वर…योगीराज… श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ! अशा अनेकानेक घोषणा देत शेकडो शिवभक्त गावागावात शिवजयंती साजरी करीत आहे. घराघरात शिवाजी महाराजांच्या जन्मानिमित्त अभूतपूर्व उत्साह संचारलेला असून इगतपुरी तालुक्यात जणू काही शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. गावोगावी विविध कार्यक्रम, व्याख्याने, सामाजिक कार्यक्रम आणि विचारांची देवाणघेवाण करणारे कार्यक्रम होताहेत. मिरवणुकांत सहभागी होणाऱ्या मावळ्यांच्या अंगात शिवभक्तीचा जबरदस्त संचार झालेला दिसून येत आहे. अशा शिवभक्तीने व्यापलेल्या वातावरणात इगतपुरी तालुक्यात साकुर येथील शिवभक्त अशोक मधुकर पा. सहाणे यांच्या २ महिन्याच्या मल्हारराजे उर्फ हर्षवर्धनराजे असे नाव ठेवलेल्या बाळाला केलेली बाळ शिवाजी राजेंची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्यासोबत शिवाजी राजेंच्या चीजवस्तू सुद्धा सर्वांना आकर्षित करत आहेत. शिवजयंतीच्या मंगल पर्वावर मल्हारराजे उर्फ हर्षवर्धनराजे हे बाळ २ महिन्यांचे झाले असल्याने उत्साहाला उधाण आले आहे. यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, अनाथ मुलांना अन्नदान आणि शिवचरित्र पुस्तक वाटप करणार असल्याचे सौ. कांचन अशोक पा. सहाणे यांनी सांगितले.
शिवभक्त दरवर्षी शिवजयंतीची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाची शिवजयंती देखील सर्वांसाठी खूपच खास आहे. कोरोना महामारीच्या नंतर निर्बंधाचा अडसर दूर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव जन्मोत्सवाचा सोहळा साजरा केला जात आहे. पाळणा गाऊन शिवरायांचा जन्म साजरा करण्याची पद्धत आहे. यंदा कोरोनाचं संकट थोडं आटोक्यात असल्याने शिबप्रेमी उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा आणि शिवजयंतीचे कार्यक्रम करीत आहेत. साकुर येथील कमलाबाई आणि मधुकर धनाजी पा. सहाणे यांचे सुपुत्र अशोक हे शिवभक्त म्हणून ओळखले जातात. आशाबाई आणि ज्ञानेश्वर संतुजी पा. दिघे यांची शिवकन्या कांचन हे दाम्पत्य शिवविचारांचे पाईक आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पहिल्या मुलीचे नाव सुद्धा शिवकालीन “सई” असे ठेवलेले आहे. आपल्या व्यवसायाला त्यांनी हेच नाव ब्रँड म्हणून दिलेले आहे. यांनी व्यवसायाचा आरंभ आणि गृहप्रवेश शिवधर्म पद्धतीने केलेला आहे. २ महिन्यांपूर्वी सहाणे यांच्या परिवारात मल्हारराजे उर्फ हर्षवर्धनराजे ह्या चिमुरड्याचा जन्म झाला.
शिवजयंतीच्या पर्वावर मल्हारराजे २ महिन्यांचा झाल्याने सहाणे आणि दिघे पाटील परिवाराने प्रचंड उत्साहात शिवजयंतीचा मंगल मुहूर्त साधून शिवजयंती साजरी केली. मल्हारराजेला बाळ शिवाजी राजेंची सगळी वेशभूषा आणि सगळ्या चीजवस्तू आणून अभुतपूर्व जयंती साजरी झाली. यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, अनाथ मुलांना अन्नदान आणि शिवचरित्र पुस्तक वाटप करणार असल्याचे सौ. कांचन अशोक पा. सहाणे यांनी सांगितले. बाळाचा पुढील वर्षाचा वाढदिवस रायगडावर जाऊन बाळाला महाराजांचा चरणस्पर्श करून साजरा करू असे आजोबा ज्ञानेश्वर पा. दिघे यांनी सांगितले. आशीर्वादासोबतच विचार वाटुया, लोककल्याणकारी राज्य घडवूया…यासाठी आमच्या सहाणे आणि दिघे परिवाराकडून खारीचा वाटा उचलून नेहमीच सक्रिय राहू असे श्री. अशोक आणि सौ. कांचन पा. सहाणे यांनी म्हटले आहे.