
इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
वाडीवऱ्हेजवळ ब्रेक फेल झाल्याने अचानक जागेवर थांबलेल्या कंटेनरच्या मागून येणारी कार थेट कंटेनरच्या खाली घुसली. त्यामुळे मोठा अपघात झाला. मात्र दैव बलवत्तर असल्याने कारमध्ये प्रवास करणारे ५ शिक्षक बचावले. मुंढेगावजवळ झालेल्या शिक्षकांच्या अपघाताचा थरकाप ताजा असतानाच हा अपघात झाल्याने सर्वांना धसका बसला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल झाले. तथापि सर्वांना सुखरूप पाहून त्यांनी घाबरलेल्या शिक्षकांना चांगला धीर दिला.
मुंबई आग्रा महामार्गावर नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक MH 15 DK 7586 हा आज सकाळी पावणेबारा वाजेच्या दरम्यान वाडीवऱ्हेजवळ ब्रेक फेल झाला. अचानक थांबण्यासाठी कंटेनरचालक प्रयत्न करीत होता. त्याला वेगवान कंटेनर थांवण्यात यश आले. मात्र पाठीमागून येणारी कार क्रमांक MH 04 FF 7111 ही कंटेनर अचानक थांबल्याने भरधावपणे कंटेनरच्या खाली घुसली. कारमध्ये वाडीवऱ्हे येथील माध्यमिक विद्यालयात कार्यरत असणारे ५ माध्यमिक शिक्षक होते. दैव बलवत्तर असल्याने कोणालाही काही इजा न होता सर्वांचा प्राण बचावला आहे. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने मदतकार्य केले. अडकलेल्या शिक्षकांना बाहेर काढण्यात आले. घाबरून गेलेल्या शिक्षकांना रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी दिलासा दिला. मुंढेगाव जवळील अपघातात शिक्षकांना प्राण गमवावा लागल्याची घटना ताजी असताना हा अपघात झाल्याने धसका बसला. परमेश्वर कृपेने सर्वजण सुखरूप असल्याने नागरिकांनी देवाचे आभार मानले.
दरम्यान याचवेळी दुसऱ्या एका अपघातात गाय आडवी गेल्यामुळे मोटरसायकल घसरली. ह्यामध्ये रफिक अब्दुल रज्जाक पठाण वय 48, मोहम्मद इरफान खान वय 35 दोघे राहणार नाशिक हे जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.