लेखन : डॉ. कल्पना श्रीधर नागरे, मानसशास्त्रज्ञ
सालाबादप्रमाणे नवे वर्ष नवा संकल्प असे दरवर्षी नूतन वर्षाचे स्वागत जल्लोषात करताना नवनवे संकल्प सोडले जातात. हे संकल्प पहिले काही दिवस अगदी उत्साहाने पाळले जातात. काही दिवसांनी मात्र कंटाळा येऊ लागतो. मग परत पुढच्या वर्षी करू, एवढं वर्ष नकोच काही असे म्हणणारे लोक दिसुन येतात. यावर्षीही बरेच लोक संकल्प करणार आहेत यात शंकाच नाही. प्रत्येकाचे संकल्प वेगवेगळे असतात. यावेळी मात्र एक नवा आणि आगळावेगळा संकल्प करूया. मानसिक आरोग्याचा हा संकल्प आपल्या इतर अनेक स्वप्नांना मूर्त स्वरूप देऊ शकतो. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बरेच लोक सुदृढ आरोग्यासाठी व्यायामाचा संकल्प करतात. त्यासाठी आधी आरोग्य म्हणजे काय हे समजुन घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण बाहेरून ठणठणीत दिसणारी व्यक्ती आतूनही तशीच असेल असे मात्र अजिबात नाही. याचे उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर सिद्धार्थ शुक्ला यांचे देता येईल. तीन तीन तास जिममध्ये घाम गळणारा सिद्धार्थ आतून मात्र ढासळलेला होता. उत्तम आरोग्य म्हणजे “शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टीने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय.” शारीरिक आरोग्य जसे महत्वाचे तसेच किंबहुना त्याहूनही आधिक मानसिक आरोग्य जपणे आवश्यक असते.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. अजूनही परिस्थीती बदलेली नाही. या महामारीच्या काळात हजारो लोक मृत्यू पावले आहेत. हे जरी सत्य असले तरी प्रत्यक्ष आजारपणामुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांपेक्षा केवळ भीतीने मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या कित्येक पटीने अधिक आहे. हे सत्य आणि भयानक वास्तव आहे. काही लोकं नुसते कोरोना झाल्याच्या धक्क्यानेच मृत्यू पावले आहेत.एवढे ते मानसिक दृष्ट्या कमकुवत होते. याहूनही गंभीर बाब ही खूप साऱ्या आत्महत्येच्या प्रकरणांनी चर्चेचे विषय रंगले. या सर्व गोष्टीतून एकच अन्वयार्थ निघतो की, आज संपूर्ण जगाला मानसिक आरोग्य समस्येने ग्रासलेले आहे हे मात्र नक्की…!
मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे. मानसिक आजार ही एक वैद्यकीय अवस्था असून यामध्ये माणसाच्या भावना, विचार, परस्पर सबंध व दैनंदिन जीवनातल्या गोष्टी यावर विपरित परिणाम होतो. अति राग, अति स्पर्धा, वरचढ ठरण्याची प्रवृत्ती, अति लोभ, अति अपेक्षा धूम्रपान, मद्यपान, असुरक्षित भावना आदींसारख्या चुकीच्या सवयीमुळे जवळ्पास सर्वांचे मानसिक आरोग्य थोड्या फार प्रमाणात प्रभावित झालेले आहे. मानसिक आरोग्य जपण्यासाठी फार काही करायची आवश्यकता नाही. फक्त जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. रोजचा दिवस एक नवी दिशा आणि आशा घेऊन येत असते. त्याकडे एक संधी म्हणुन बघा. सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा. जेणेकरून तुम्हालाही सकारात्मक ऊर्जा मिळेल. मानसिक आरोग्य जपण्यासाठी विचार शैली बदला. विचार बदलले की मानसिक स्थिती सुद्धा बदलते. आजच्या काळात निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित समस्यांना तोंड देण्यासाठी सर्वानाच मानसिक दृष्ट्या कणखर राहण्याची गरज आहे. म्हणुनच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक संकल्प करा स्वतःचा, स्वतः साठी आणि आपल्या परिवारासाठीही आनंदी जीवनाचा आणि मानसिक आरोग्याचा..! सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….