इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..असे श्रद्धा ज्याच्या उरी.. त्यासी दिसे हा कानिफा मुरारी.. भाविकांच्या अशा अनेकानेक घोषणांनी इगतपुरी परिसर दत्त जन्मोत्सवानिमित्त दुमदुमला. हजारो दत्त आणि कानिफनाथ भक्तांनी दत्तजन्माचा जल्लोष केला. इगतपुरी येथील ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथ मंदिराचे सर्वेसर्वा ह. भ. प. गुरुवर्य सावळीराम महाराज शिंगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी शहरात दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला राज्यभरातील भाविकांनी दिवसभर हजेरी लावून विविध कार्यक्रमांचा लाभ घेतला. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ३० लाख रुपयांच्या सभामंडप दिल्याची घोषणा केली. नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी अनुमोदन देत आवश्यक सहकार्य करणार असल्याचा शब्द दिला.
इगतपुरी येथील ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथ मंदिराचे सर्वेसर्वा ह. भ. प. गुरुवर्य सावळीराम महाराज शिंगोळे यांच्या कुशल नियोजनाखाली दत्तजयंती उत्साहात साजरी झाली. यानिमित्त आठवड्यापासून शेकडो भाविकांच्या गुरुचरित्र पारायणाची सांगता करण्यात आली. उपस्थित भाविकांसाठी गुरुवर्य सावळीराम महाराज शिंगोळे आणि इतर तज्ज्ञ विचारवंतांनी अध्यात्मिक प्रबोधन केले. इगतपुरी शहरातून राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी गुरुपादुका जन्म सोहळ्यात दत्तगुरूंचा आणि कानिफनाथ महाराजांचा जयघोष केला. दुपारी 12 वाजता हजारो भाविकांनी दत्तजन्माचा महोत्सव साजरा केला. यानंतर हजारो भाविक भक्तांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथ सेवा मंडळाने इगतपुरी परिसर आणि मंदिर भागात स्वयंप्रेरणेने चोख व्यवस्था ठेवली. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या गर्दीत कार्यक्रम सुरूच राहणार आहेत. यावेळी आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, नाशिकचे लक्ष्मण सावजी, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, संदीप गुळवे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, सामाजिक कार्यकर्ते किरण फलटणकर, संपत काळे, पत्रकार भास्कर सोनवणे, टिटोलीचे सरपंच अनिल भोपे, जे. के. मानवडे आदी उपस्थित होते.