इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
खरा निर्मळ विकास पाहिजे असेल तर वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटासाठी फक्त गणपत जाधव हाच उमेदवार निवडून देण्याचा निर्धार इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ह्या मोठ्या गावाने केला आहे. तरुणाई, जेष्ठ नागरिक आणि महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने गणपत जाधव यांना जिल्हा परिषदेत पाठवण्यासाठी दृढनिश्चय करण्यात आला. कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली तरी अशा विकासाभिमुख व्यक्तिमत्वाला संपूर्ण गोंदे दुमाला गावातील तमाम नागरिकांचे मतदान गणपत जाधव यांच्या पारड्यात टाकण्यात येईल असा एकमुखी ठराव करण्यात आला. एखाद्या गावाने बैठक घेऊन उमेदवार निश्चित करून त्याला विजयी करण्यासाठी संकल्प करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. दरम्यान गणपत जाधव यांनी गोंदे दुमाला गावकऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करीत विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून विश्वास सार्थ ठरविल अशी ग्वाही दिली.
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे परशुराम बाबा मारुती मंदिर सभागृहात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतःहून बैठक घेतली. बैठकीला गावातील जेष्ठ ग्रामस्थ, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने हजर होते. गोंदे दुमालाचे माजी सरपंच गणपत कुंडलिक जाधव यांच्या उमेदवारी संदर्भात सर्व ग्रामस्थांनी सखोल चर्चा केली. अनेक ग्रामस्थांनी स्वतःहून पुढे येऊन गणपत जाधव यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. माजी सरपंच गणपत जाधव यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत वाडीवऱ्हे गटातून उमेदवारी करावी. पक्ष कुठलाही असो पण गावाच्या वतीने त्यांनीच उमेदवारी करावी. संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असा निर्धार सर्व ग्रामस्थांनी केला.
गणपत जाधव यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळात गावात विविध विकासकामे केली. अशीच विकासकामे वाडीवऱ्हे गटात निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून होऊन गटाचा चेहरामोहरा बदलला जाईल. विकासापासून दूर असलेल्या वाडीवऱ्हे गटाला जिल्ह्यात क्रमांक एकचा विकसित गट करण्यासाठी गणपत जाधव यांच्याशिवाय पर्याय नाही असा सुर संपूर्ण बैठकीत उमटला. बैठकीचा समारोप करतांना गणपत जाधव म्हणाले की, यापूर्वी गावाने मला सेवेची संधी दिल्याने मी गावाला विकसित करू शकलो. माझे गोंदे दुमाला गाव माझ्या पाठीशी भक्कमपणाने उभे आहे. त्यामुळे वाडीवऱ्हे गटातुन लोकांच्या आशीर्वादाने मला सेवा करण्याची संधी नक्कीच मिळेल असे मी मानतो. दरम्यान मोठ्या मतदानाच्या एखाद्या गावाने उमेदवार निश्चित करून विजयाचा निश्चय करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असून ह्या परिसरात गणपत जाधव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.