इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
मुंबई आग्रा महामार्गावरील मुंढेगावपासून बळवंतनगर वाघोबाची वाडीला जोडणाऱ्या रस्त्यातील रेल्वेच्या पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे आदिवासी नागरिकांना प्रचंड त्रास भोगावा लागत आहे. पावसाळ्यात तर भयानक त्रासाचा सामना आदिवासी नागरिकांना करावा लागतो. ह्या पाण्यात गाळ साचलेला असल्याने मोटारसायकली बंद पडतात. आजारी व्यक्तींना अत्यावश्यक उपचारासाठी नेतांना मोठ्या प्रमाणावर हाल होतच असतात. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी महामार्गावर यायला सुद्धा मोठी कसरत करावी लागते. दररोज अनेक मोटारसायकली आणि त्यावरील आदिवासी नागरिक पाण्यात पडत असतात. ह्या भागातील आदिवासी नागरिक महाराष्ट्र शासन, केंद्र शासन आणि लोकप्रतिनिधींना शिव्यांची मनोमन लाखोली वाहत असतात. शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतमाल नेण्यासाठी हा त्रासदायक प्रवास करावा लागतो. खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून लक्ष घालणार आहेत का ? असा प्रश्न विचारला जात आहे. लोकप्रतिनिधींनी ठरवलं तर दोन तासात इथला प्रश्न संपवता येईल. कोणी पुढाकार घेणार आहे की नाही ??