इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
इगतपुरी आणि सिन्नरच्या हद्दीवरील औंढेवाडी ( ता. सिन्नर ) येथील डोंगराळ जंगली भागात १८ ते २० वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत औंढेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच मोहन कुंदे आदींनी सिन्नर पोलिसांना आज दुपारी २ वाजता कळवले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. मात्र दुपारपासून अनोळखी युवतीचा मृतदेह जागेवरच पडून असून पुढील सोपस्कार, पंचनामा, उत्तरीय तपासणी आदी प्रक्रिया प्रलंबित आहे. ह्या प्रेताची राखण कोणी करायची ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित परीसरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन उत्तरीय तपासणी करण्यास नकार दिल्याचे समजते. दरम्यान हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता असून पोलीस प्रशासनाने तातडीने युवतीचे प्रेत ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करावी अशी मागणी औंढेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच मोहन कुंदे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे. अनोळखी युवतीचा मृतदेह आधीच आठवड्याच्या आधीचा असून ही घटना उघडकीस येऊन अनेक तास उलटले आहेत. मात्र पोलिसांकडून प्रेत ताब्यात घेतले नसून ह्या प्रेताची राखण कोणी करायची असा सवाल उपस्थित होत आहे. सिन्नर पोलिसांनी तातडीने प्रेत ताब्यात घ्यावे आणि पुढील तपास सुरू करावा अशी मागणी निवेदनात नमूद आहे. निवेदनावर सरपंच मोहन कुंदे, उपसरपंच संतोष कुंदे, पोलीस पाटील नाना कुंदे, दत्तू कुंदे, बाळू कुंदे, विशाल कुंदे, गोरख कोरडे, बस्तीराम कुंदे, नागेश कुंदे, कचरू कुंदे, धोंडबारचे पोलीस पाटील चंद्रभान खेताडे यांच्या सह्या आहेत.