निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
इगतपुरी तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. यासह विविध भागात बिबटे मानवी वस्तीत निदर्शनास येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार वन्य प्राण्यांपासून बचाव आणि सावधानता पाळण्यासाठी वनविभागाच्या पश्चिम विभाग इगतपुरी अंतर्गत सर्व गावांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली आहे. नागरिकांकडून जनजागृतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी कळवले आहे. ह्या कार्यासाठी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी दत्तू ढोन्नर, भाऊसाहेब राव, पोपट डांगे, शैलेंद्र झुटे यांच्या नेतृत्वाखालील पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.
ह्या जनजागर कार्यक्रमात वनविभागाच्या शासकीय वाहनाद्वारे ध्वनिक्षेपक, बॅनर वापरून गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये अधिकारी कर्मचारी नागरिकांना बिबट-मानव संघर्षाचे बारकावे समजावून सांगत आहेत. जनजागृती पथकामध्ये चिंचलेखैरेचे वनरक्षक फैजअली सय्यद, खैरगावचे वनरक्षक व्ही. पी. गावंडे, कुरुंगवाडीच्या वनरक्षक प्रियंका साबळे, काळुस्तेच्या वनरक्षक मंगला धादवड, घोटीच्या आगार रक्षक मनीषा टोचे, एम. जे पाडवी, एस. डी. लोखंडे, गोरख बागुल, घाटेसाव, आर. टी. पाठक, पोटींदे, मुज्जू शेख आदींचा समावेश आहे. जनजागृती करण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
● वाड्या-वस्त्या व मळ्यात राहणाऱ्या लोकांनी शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये.
● पशुधन बंदिस्त जागी बांधावे.
● भात, नागली, वरई कापणीच्या वेळी उशीर झाल्यास विशेष काळजी घ्यावी.
● रात्रीच्या वेळी वृद्ध व बालकांना एकटे सोडू नका.
● घराबाहेर मोकळ्या जागेत झोपणे टाळा.
● वन्यप्राणी दिसल्यास त्याचा पाठलाग न करता तात्काळ वनविभागाला कळवा.