इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
इगतपुरी शहर, काळूस्ते, पिंपळगाव मोर भागातील बिबट्याचे लोन आता पूर्व भागातील कुऱ्हेगाव येथे येऊन पोहोचले आहे. ३ दिवसांपूर्वी अशोक बाबुराव धोंगडे यांच्या वासरावर सायंकाळी ६ वाजता हल्ला करून बिबट्याने गंभीर जखमी केले. अशोक धोंगडे यांचा मुलगा संजय धोंगडे याने आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. वासरावर जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याबाबत पोलीस पाटलांच्या मार्फत वन कर्मचाऱ्यांना कळवूनही ते अद्यापही घटनास्थळी पोहोचले नाहीत. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी याबाबत सांगितले की, ह्या घटनेबाबत अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार तालुका कार्यालयात आलेली नाही. चौकशी करून याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल. घटनेच्या दिवशी फोडसेवाडी येथील रेस्क्यू टीममध्ये असलेले येथील वन कर्मचारी गेले असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांना ह्या घटनेबाबत माहिती देऊनही ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीही घटनेबाबत कुऱ्हेगाव येथे आले नाहीत. या ढिम्म कारभारामुळे संताप वाढला आहे. कुऱ्हेगाव परिसरात रोज बिबटे दिसत असल्याचे अशोक बाबुराव धोंगडे यांनी निवेदनात म्हटले आहे. अंधार पडलेला नसतानाही बिबट्यांचा संचार वाढत असल्याने भात सोंगणी वगैरे शेतीची कामे रात्रीच्या वेळी कशी करावी असा प्रश्न या भागातील लोकांना पडला आहे. वन खात्याने ढिम्म कारभार सोडून ह्या गावातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नियोजन करावे अशी मागणी होत आहे. दरम्यान ह्या घटनेप्रकरणी संबंधित वन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावून योग्य कारवाई केल्यास त्यांचा ढिम्म कारभार उघडकीस येईल असे नागरिक सांगतात.