निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
घोटी सिन्नर मार्गावरील अत्यंत वर्दळीचे म्हणून पिंपळगाव मोर ओळखले जाते. पिंपळगाव मोरहुन एक रस्ता सिन्नर- शिर्डीकडे तर एक रस्ता भंडारदरा-राजूरकडे जातो. सिन्नर -वैजापूर औद्योगिक वसाहतींच्या कच्चा माल घेऊन अनेक वाहने प्रवाहित होत असतात. वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या रस्त्यांसाठी गावच्या दोन्ही बाजूला गतिरोधक असावे अशी नागरिकांची मागणी नेहमीच होती. गेल्या महिनाभरापासून पिंपळगाव मोरच्या दोन्ही बाजूला गतिरोधकाचा फलक लागलेले आहेत. परंतु बांधकाम विभागाला सदर ठिकाणी गतिरोधक टाकण्याचा मुहूर्त अद्यापही सापडला नाही की काय ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. समृद्धी महामार्गाच्या गाड्यांची वर्दळ व मोठमोठ्या दैनंदिन वाहतुकीने नागरिक त्रस्त झाले असून लवकरात लवकर गतिरोधक टाकावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.