इगतपुरीनामा न्यूज, दि. १
नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी, गांधी जयंती निमित्त नाशिक ते मुंबई सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी मुंबई नाका येथून या रॅलीस प्रारंभ झाला. लायन्स क्लब ऑफ कॉर्पोरेटचे अध्यक्ष विनय बिरारी व गौरी सामाजिक कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी नायडू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या राईडचा प्रारंभ झाला. 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आरोग्याच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने सायकल चळवळ व्यापक व्हावी, NetZeroIndia ही चळवळ भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया येथून सुरु करण्यात आली आहे.
सध्याच्या वातावरणात हरितगृह वायूचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे. वातावरणात मोठे बदल घडत आहेत. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करावे. त्यादृष्टीने दैनंदिन जीवनात वाहतुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर किमान आठवड्यातून एकदा तरी करावा. नाही जमल्यास महिन्यातून एकदा तरी करावा. इलेक्ट्रिक बाईकचा वापर करावा. जेणेकरून प्रदूषण कमी होईल व पर्यावरणाची हानी टळेल.
#NetZeroIndia या मोहिमेची दखल शासनाने घेतल्यास नक्कीच नागरिक आठवड्यातून एकदा किंवा किमान महिन्यातून एकदा “नो व्हेइकल डे” पाळतील असे मत नाशिक सायकलीस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी केले. या राईडमध्ये 25 सायकलिस्ट सहभागी झाले. त्यात आठ महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. नाशिक ते मुंबई या 190 किमी प्रवास दरम्यान ठिकठिकाणी भेटी घेऊन प्रदूषण कमी करण्यासाठी आपण कशाप्रकारे योगदान देऊ शकतो याबद्दल सायकलिस्ट नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
शनिवारी सकाळी 7 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या हस्ते “नेट झिरो इंडिया” या मोहिमेस प्रारंभ होईल. या राईडमध्ये राजेंद्र वानखेडे, चंद्रकांत नाईक ,रवींद्र दुसाने, डॉ. मनिषा रौंदळ, साधना दुसाने, वैशाली शेलार, राजेश्वर सूर्यवंशी, रियाज अन्सारी, निरंजन जोशी, ऋतुराज वाघ, आनंद गायधनी, अविनाश लोखंडे, दविंदर भेला, किशोर काळे, माधुरी गडाख, मिलिंद इंगळे, नलिनी कड, प्रवीण कोकाटे, चिन्मयी शेलार, ऐश्वर्या वाघ, मोहन देसाई, गणेश माळी, सुरेश डोंगरे हे सहभागी झाले आहेत. याकामी दीपक मोरे, हेमंत खेलूकर, गजानन भावसार व भक्ती दुसाने यांनी सहाय्य केले.