इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
कोरोना लसीकरण करून परतत असणाऱ्या वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय वाहनाला पाडळी देशमुखजवळ अपघात झाला आहे. मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ह्या वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने ठोकल्याने हा अपघात झाला. आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमाराला ही घटना झाली. ह्या अपघातात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ९ आरोग्य कर्मचारी जखमी झाले आहेत. जगतद्गुरू नरेंद्राचार्य महाराज मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी समयसुचकतेने सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
आज गरुडेश्वर येथील लसीकरण आटोपून वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन क्रमांक MH 15 AB 127 हे आरोग्य केंद्राच्या दिशेने चालले होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमाराला ह्या वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने ठोकले. यावेळी झालेल्या अपघातात वाहनचालक रज्जाकभाई शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी, श्रावण खैरनार, निकिता कापडणीस, स्वप्नाली डोंगरे, भाग्यश्री घरटे, सुनीता अस्वले, शोभा मोरे, वर्षा पवार हे ९ जण जखमी झाले. याबाबत माहिती समजताच जगतद्गुरू नरेंद्राचार्य महाराज मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी तातडीने जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघात झाल्याचे माहीत होताच मदतीचा ओघ सुरू झाला. वाडीवऱ्हे पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.