इगतपुरी खोटी शिक्षक भरती प्रकरण : आश्रमशाळा संस्था अध्यक्षाला मिळाली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

इगतपुरी तालुक्यातील एका तथाकथित सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेचे संस्थाचालक अध्यक्ष गोपाळ पवार यांनी बेकायदेशीर शिक्षक भरती राबवुन बेरोजगार तरुण तरुणींची फसवणुक केल्याप्रकरणी इगतपुरी न्यायालयाने अध्यक्षाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गोपाळ मधुकर पवार, रा. आंबेजोगई, जि. बीड याच्यावर इगतपुरी पोलीस ठाण्यात फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या शिक्षण संस्थेने शासनातंर्गत मान्यताप्राप्त असल्याचा हवाला देत प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, अधिक्षक, लिपीक, प्रयोगशाळा शिपाई, स्वयपाकी, कंत्राटी व मदतनीस असे २८ पदे भरण्यासाठी जाहिरात देऊन मुलाखतीसाठी इगतपुरीत बोलावले होते. या भरतीसाठी महाराष्ट्र भरातुन बेरोजगार तरुण व तरुणी इगतपुरीत आले होते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नोकर भरतीचा घाट घातला होता. सावित्रीबाई फुले या नावाने खोटी व बोगस जाहिरात प्रसिद्ध करून नोकरीचे आमिष दाखवुन बेरोजगारांना गंडविण्यासाठी इगतपुरीत कासार नावाची बिल्डींग भाड्याने घेऊन येथे शिक्षक भरतीसाठी बेरोजगार तरूण तरुणींना मुलाखतीसाठी शनिवारि १७ ला बोलवण्यात आले होते.

त्यांच्या या जाहिरातीच्या आमिषाला बळी पडुन महाराष्ट्र भरातुन सुमारे १५०० बेरोजगार तरूण तरुणी मुलाखत देण्यासाठी इगतपुरीत आले होते. मात्र इगतपुरी येथील आवळखेड येथे या नावाची शाळाच नसल्याची व शिक्षक भरतीला सामाजिक न्याय विभागाची परवानगीच नसल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांना समजताच त्यांनी थेट मुलाखतीस्थळी भेट देत याबाबत जाब विचारला असता मुलाखती घेत असलेल्या संस्थाचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर गोरख बोडके यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी आश्रमशाळा संस्थाचालक गोपाळ पवार याला पोलीस ठाण्यात आणुन चौकशी सुरु केली. शिपाई पदाकरता मुलाखतीसाठी आलेल्या देविदास रामा भोईर यांनी या प्रकरणी आश्रमशाळा संस्थाचालक अनिल मधुकर पवार याच्यावर फसवणुक केल्याची फिर्याद दाखल केली. पवार याच्यावर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी गोपाळ पवार याला इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्या. प्र. प्र. गिरी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारी वकील म्हणुन ॲड. सुवर्णा महाले यांनी काम पाहिले. संस्थाचालकाच्या बाजुने ॲड. ए. डी. मेमन यांनी बाजु मांडली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक वसंत पथवे, उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे, पोलीस हवालदार संदीप शिंदे, विजय रुद्रे, राहुल साळवे, सचिन देसले, फकीरा थोरात, सचिन बेंडकुळे, महिला पोलीस कल्पना वाघ, पुनम बर्वे आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!