गायींना बेशुद्ध करून चोऱ्या करणाऱ्या टोळीपैकी एकजण स्कार्पिओसह जेरबंद ; गोवंश चोरीचे भिवंडी कनेक्शन : इगतपुरी पोलिसांत गुन्हा दाखल

शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

इगतपुरी शहरात  मुक्या जनावरांना इंजेक्शन देत बेशुद्ध करत गोवंश चोरी करणाऱ्या टोळीपैकी एका जणांस इगतपुरी पोलिसांनी वाहनासह अटक केली आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आबिद मुनीर शेख वय 32 रा. भिवंडी असे या संशयित आरोपीचे नाव आहे. तर त्याचे साथीदार  पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. इगतपुरी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गोवंश चोरीच्या काही घटना या पूर्वी इगतपुरी परिसरात घडल्या होत्या. त्यातील काही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करून बऱ्याच दिवसांपासून चोरट्यांच्या मागावर होते. मात्र चोरांचा तपास लागत नव्हता. काल मध्यरात्रीच्या सुमारास इगतपुरी शहरातील पवार चाळीतील विक्रम पवार, मनोज पवार, अक्षय पवार, सुमेध वाडेकर, बाळू चव्हाण हे युवक घरी येत असताना त्यांना काही इसम विपश्यना केंद्र पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्कॉर्पिओ गाडी घेऊन उभे असल्याचे दिसले. गाडीच्या बाजूस गाय मूर्च्छित अवस्थेत पडलेली दिसली. त्यांना संशय आल्याने त्यांनी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या इगतपुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले. त्यांना घेरायचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गस्ती वर असलेल्या वाहन व खासगी वाहनाने पाठलाग करून त्यांच्या गाडीला पोलिसांनी अडविले.  पोलिसांनी गाडीच्या दिशेने धाव घेतली. मात्र अंधाराचा फायदा घेऊन गाडीतील इसम पळून जात असताना संशयित आबिद मुनीर शेख वय 32 रा. भिवंडी यास पकडले. त्याचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या चार चाकी स्कॉर्पिओ वाहनात इंजेक्शन, गुंगीच्या औषधाची बाटली आढळली असून बिना नंबर प्लेटची होंडा डियो दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. ह्या कामगिरीत इगतपुरीचे वरिष्ठपोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे, सचिन देसले, विजय रुद्रे,   भगरे व होमगार्ड पथकाचे सचिन चौरे, मोहन आडोळे, संतोष सोनवणे, शिवाजी बऱ्हे सहभागी होते.

असे करायचे चोरी

हे चोर दिवसा दुचाकीने फिरून कोणत्या ठिकाणी गोपालक त्यांच्या गायी बांधतात याची रेकी करायचे. रात्रीच्या सुमारास  दुचाकीवर येऊन त्यांना बेशुद्धीचे इंजेक्शन द्यायचे. त्यानंतर पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनाने गाय, त्यांचे बछडे चोरायचे. चोरलेले गोवंश पळवण्यासाठी ही टोळी कारच्या मागील बाजूची सीट काढून तिथे गाईंना क्रूर पद्धतीने कोंबत असत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!