इगतपुरी तालुक्यातील आतापर्यंतची पहिलीच शस्त्रक्रिया
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
इगतपुरी, घोटी म्हटले की आदिवासी आणि अतिदुर्गम तालुका डोळ्यांसमोर उभा राहतो. साहजिकच इथल्या आरोग्य सुविधा सुद्धा जेमतेम असाव्या अशी सर्वांची धारणा आहे. यामुळेच मोठ्या शहरांकडे आरोग्याच्या विशिष्ठ सुविधांसाठी अनेकजण जात असतात. अशा परिस्थितीत घोटी येथील डॉ. जितेंद्र चोरडिया यांनी लोकांची गैरसमजुत दूर केली आहे. घोटीसारख्या शहरातही आता अवघडात अवघड शस्त्रक्रिया व्हायला लागल्या असल्याचा प्रत्यय त्यांच्या मातोश्री हॉस्पिटलने सर्वांसमोर ठेवला आहे. बुधवारी दि. २५ ला ह्या हॉस्पिटलमध्ये हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. विशेष म्हणजे मातोश्री हॉस्पिटलने केलेली इगतपुरी तालुक्यातील एवढी मोठी पहिलीच शस्त्रक्रिया आहे. इगतपुरी तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राने मातोश्री हॉस्पिटलचे याबाबत विशेष अभिनंदन केले आहे. इगतपुरी सारख्या तालुक्यातही अवघड शस्त्रक्रिया व्हायला लागल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील खंडू दालभगत हे ३९ वर्षाचे व्यक्ती एव्हस्क्युलर नेक्रोसिस ह्या आजाराने त्रासले होते. गेल्या १ वर्षांपासून ह्या आजारावर इलाज करण्यासाठी त्यांनी अनेक डॉक्टरांचे उंबरठे झिजवले. यामध्ये आर्थिक फटका तर बसलाच पण आजार काही बरा झाला नाही. शेवटी घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलमध्ये त्यांनी तपासणी केल्यावर त्यांना एमआरआय करण्यासाठी सांगण्यात आले. ह्या तपासणीनंतर संबंधित डॉक्टरांनी आजाराचे योग्य निदान केले. यामध्ये त्यांचे कंबरेचे हाड आणि मांडीचा खुबा पूर्णपणे खराब झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तो बदलण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय डॉक्टरांकडे नव्हता. म्हणून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार बुधवारी घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलमध्ये खंडू दालभगत यांच्या सांधे बदलाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. डॉ. भूषण देशमख, डॉ. ऋषिकेश परदेशी, डॉ. जितेंद्र चोरडिया, डॉ. हेमलता चोरडिया, Maxtra कंपनीचे तंत्रज्ञ ह्या ७ जणांच्या टीमने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली. जवळपास ५ तास चाललेली ही अवघड शस्त्रक्रिया इगतपुरी तालुक्यातील पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया आहे. ह्यामुळे संबंधित रुग्णाचे जुनाट दुखणे आता कायमचे दूर झाले आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकला मोठा खर्च होणारी ही शस्त्रक्रिया घोटीसारख्या ग्रामीण भागात झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात आला. याबाबत माहिती मिळताच मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. जितेंद्र चोरडिया आणि सहकारी यांच्यावर अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
मातोश्री हॉस्पिटल नेहमीच बदलणाऱ्या आरोग्य सेवांबाबत पीडित रुग्णांना दिलासा देण्यासाठी आघाडीवर असते. मोठ्या महानगरांमध्ये उपलब्ध सेवा आमच्या हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी आम्ही कृतिशील असतो. त्यानुसार खंडू दालभगत यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रिया इगतपुरी तालुक्यातील अवघड असणारी पहिलीच शस्त्रक्रिया आहे. आमच्या सहकाऱ्यांचे मी विशेष कौतुक करतो.
- डॉ. जितेंद्र चोरडिया, संचालक मातोश्री हॉस्पिटल घोटी
काय आहे हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ?
हिप रिप्लेसमेंट किंवा ऑर्थोप्लास्टीमध्ये निकामी झालेल्या ठिकाणचे सांधे काढून टाकण्यात येतात. त्या जागी नवे कृत्रिम अवयव बसवले जातात. या कृत्रिम अवयवांना प्रॉस्थेसिस असे म्हणतात. सर्जरीचे उद्दिष्ट सांधे दुरुस्त करून त्यांना पुन्हा उपयोगात आणण्याचे आहे. त्यामुळे रुग्णाच्या वेदना कमी होतात आणि तो सामान्य आयुष्य जगू शकतो. नव्या तंत्रामुळे कृत्रिम अवयवांना खूप सुस्थितीत तयार केले जाते. हे अवयव दीर्घ काळ टिकतात. यामध्ये पारंपरिक शस्त्रक्रिया आणि मिनिमल इनव्हेसिव्ह शस्त्रक्रिया ह्या दोन प्रकारे सर्जरी करता येते. पारंपरिक सर्जरीला एक ते दोन तास लागतात. यासाठी सर्जन हिपमध्ये ६ ते ८ इंचाचा छेद देतात. त्यानंतर रुग्णाचे निकामी झालेले हाड, पेशी आणि कार्टिलेजच्या सांध्यांना म्हणजे हिप जॉइंटपासून हटवण्यात येते. त्याजागी नवे कृत्रिम अंग बसवतात. मिनिमल इनव्हेसिव्ह सर्जरीमध्ये निकामी झालेल्या अवयवांच्या जागी नवे कृत्रिम अवयव बसवण्यासाठी सर्जन केवळ एक छोटा छेद देतात. त्याद्वारे कृत्रिम अवयव म्हणजे प्रॉस्थेसिसला निकामी अवयवाच्या जागी पुन्हा बसवले जातात.