लेखन : निलेश तुळशीराम भोपे
औषधनिर्माण शास्त्रज्ञ तथा वारकरी
‘पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे’ एवढी एकच इच्छा घेऊन वारकरी कधीच वारी चुकवत नाहीत. भागवत सांप्रदयाची परंपरा आज कित्तेक वर्षे अविरत सुरु आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे. काळ बदलला माणसं बदलली पण वारी सुरूच आहे. कित्येकांची हयात गेली पण वारी चुकली नाही. सध्या कोरोनाच्या महामारीने जग थांबले, वारीवरही मर्यादा आली, पण वारी सुरूच आहे. काहीही होवो अगदी जीव गेला तरी बेहत्तर पण वारी चुकु देणार नाही हा अनेक वारकरी जीवांचा आग्रह. असं असताना मागच्या वर्षापासून वारीला प्रत्यक्षात जाता आल नाही. पण पांडुरंगाचा वारकरी म्हणतो तरीही वारी सुरूच आहे.
वारी चुकली असेल तर ती पांडुरंगाची आमची नाही…मग वारी खरच चुकली का हो ? मग मनात प्रश्न येतो, का हा अट्टहास? आणि ही वारी जन्म मरणाची वारी आहे तरी नेमकी काय ??
घरुन निघावं आणि कुणी चालत, कुणी रेल्वेने, कुणी गाडीने तर कुणी हेलीकॉप्टरने पंढरपुरला जावं, मंदिरातील मूर्तीला हात जोडावे झाली वारी. इतकी सोप्पी आणि सरळ आहे का हो वारीची व्याख्या ? आणि असेल तर का करावा हा त्रागा त्यातून काय निष्पन्न होतंय ? जगाचा आणि माझा काय फायदा ? सरकारी यंत्रणा कामाला लागलीये आणि हजारो जीव पांडूरंगाचा धावा करत आहेत कित्येक वर्ष कित्येक जन्म सतत अविरत आणि निरंतर…
जीवनाच्या फेऱ्यात जगताना जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एक प्रश्न सर्वांना सारखाच पडतो. ‘मी जन्माला का आलो ?’
ह्याच उत्तर शोधता शोधता कुणी संन्यासी होतो तर कुणी शास्त्रज्ञ. कुणी हिमालयात जातो तर कुणी अवकाशात. आजवर सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून आजवर अनेकांनी ह्या एका प्रश्नामागे आयुष्य घालवलं. आले आणि निघुन गेले पण हा प्रश्न होता तसाच आहे. प्रत्येक जीवासोबत तो नव्याने जन्म घेतो. आपल्यालाही पडलाच असेल हा प्रश्न. उत्तर शोधायचा प्रयत्न केला असेल किंवा नसेल ती वैयक्तिक बाब…
कुणी म्हणतय मानवतेच्या उद्धारासाठी जन्माला आलो, पण मग बाकी सजीवांच काय त्यांच्याशी भेदभावाची संकुचित भावना का ? कुणी म्हणेल आनंदासाठी, तर आनंद ही फक्त मनाची अवस्था आहे. कुणाला कशात आनंद सापडेल सांगता येत नाही ( अनेक लोकांना वाईट गोष्टींमधे जास्त आनंद मिळतो. ) कुणी म्हणेल परमार्थप्राप्तीसाठी, अहो पण तिथूनच आपण आलो आहोत तर मग परत तिथे जाण्यासाठी हा अट्टहास का ? आणि असं पण मरणानंतर निसर्गातच विलीन होतो आपण.. कुणी म्हणेल नाव कमवायला, हा सुद्धा संकुचित विचार झाला. कारण नाव हे कधीच चिरंतन नाहिये. तुम्हाला किती कर्तृत्ववान माणसांची नाव माहीत आहेत ? ज्यांनी अपार कर्तृत्व गाजवलं त्यांच नाव देखील पृथ्वी नष्ट होताना संपून जाईल. पुन्हा विश्वाचा नवा डोलारा उभा राहील हे कालचक्र सुरूच आहे.
कुणी म्हणेल समाजकार्यासाठी, अहो पण हा समाज खुप जलद बदलतो आहे आणि फक्त गाव, देश, मानव, पृथ्वीवरचे सजीव कोण समाज ??? आपले विचार खुप संकुचित आहेत. विश्व खुप व्यापक आहे कुणीच कुणाचा उद्धार नाही करू शकत तेवढी कुणाचीच कुवत नाही. आपण जन्माला फक्त आणि फक्त जगण्यासाठी आलो आहोत हेच शाश्वत सत्य आहे.. जीवन हे नदी सारखं आहे आणि नदी वाहून नाही जात ती वाहत राहते. तस जगत रहायचं. हो आता त्यासाठी कसं जगावं वगैरे वगैरे हा पुढचा आणि ज्याच्या त्याच्या परिस्थितीचा, संस्कारांचा आणि मनाचा भाग आहे.
वारी सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र परतवारी माहीत असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत. वारी करताना जागोजागी पावलापावलांवर दानशूर लोक सोयी सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र परतवारीच्या वेळी अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. वारीला ग्लॅमर आहे, तर ‘परतवारी’ ला लाट ओसरून गेल्यानंतरचं वातावरण. अशी परतवारी नित्यनेमाने करणारेही अनेक वारकरी आहेत. त्यावर सविस्तर लिखाण होईल. पण वारी आणि परतवारी म्हणजे हे वर्तुळ आहे आणि वर्तुळाला सुरुवात आणि अंत नसतो. वारी करताना रिंगणाची परंपरा आहे. एक घोडा पुढे आणि त्यामागे एक रिकामा घोडा रिंगण घालतो आणि हजारो वारकरी या रिंगणात खेळताना सुखाने इतके धुंद होतात, की ब्रह्मैक्यभावाने कसे एकरूप झाले, हेदेखील विसरतात. जीवनाच्या परिघात ही सामरस्याची अनुभूती घेणे हेच रिंगण आहे. एका ध्येयापासून निघून ध्येयपूर्ती करून पुन्हा त्याच स्वरूपात येऊन मिळणे, हे रिंगण होय. प्रत्येकाला आपल्या ध्येयाचे, न्यायाचे, वृत्तीचे, कर्माचे, पुरुषार्थाचे रिंगण समजायला हवे. हे रिंगण उभे करून जो खेळकर भूमिकेतून जीवनाकडे पाहतो, तो जीवनवारीचा आनंदयात्री होतो.