त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळतात टॅबद्वारे शिक्षणाचे धडे
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
एकात्मिक आदिवासी विकास विभाग, नाशिक, क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट ( क्वेस्ट ) पालघर आणि एनएसई फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त सहकार्याने २०१८ पासून १८ शासकीय आश्रमशाळांमध्ये मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी अनुपद उपक्रम राबवला जात आहे. जवळपास गेल्या २ वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झालेले आहे. याचा दूरगामी परिणाम मुलांच्या पुढील शिक्षणावर होणार आहे. शाळा कधी चालू होतील ? मुले शाळेत कधी जातील ? याबद्दल अजुन ही अनिश्चितता आहे. यामुळे मुलांचं शिक्षण चालू रहावं म्हणून शासकीय पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.
ह्या पार्श्वभूमीवर क्वेस्ट संस्थेने मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी व्हॉटस ॲप चॅटबॉट नावाची नवी शिक्षण प्रणाली विकसित केली आहे. ही संस्था याद्वारे एप्रिल पासून नाशिक जिल्ह्यातील २५० मुलांसोबत ऑनलाईन शिक्षणासाठी प्रयत्न करत आहे. पण बहुतांश पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नसल्याने जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहंचणं अवघड आहे. ज्या पालकांकडे स्मार्ट फोन आहेत ते पालक दिवसभर कामानिमित्ताने बाहेर असतात. पालकांना रोज फोन करून त्यांच्या सवडी प्रमाणे मुलांना पाठवलेले स्वाध्याय सोडवून घ्यावे लागत आहेत.
पण ज्यांच्याकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत त्या मुलांचे काय ? ह्यावर क्वेस्ट संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विचार केला. संस्थेचे संचालक नीलेश निमकर यांनी ही अडचण लक्षात घेऊन टप्प्या टप्प्याने अशा मुलांपर्यंत पोहोचण्याचा आराखडा तयार केला. या मुलांसाठी टॅब उपलब्ध करून दिल्याशिवाय त्यांच्या शिक्षणाला सुरवात होणार नाही. यासाठी आश्रम शाळांमधील जास्तीत मुले ज्या ज्या गावांमध्ये आहेत अशा गावांचा डेटा जमा करण्यात आला. गावात टॅब देऊन गावातील एखाद्या स्वयंसेवकाचे प्रशिक्षण करून व त्याला योग्य ते मानधन देऊन कामाला सुरवात करावी हे निश्चित झाले.
या कामाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर या गावापासून करण्यात आला. अंबोली येथील शासकीय आश्रम शाळेत वरसविहीर गावातील बहुतेक मुले शिकतात. २३ जूनला क्वेस्ट संपूर्ण टिम वरसविहीर येथे दाखल झाली. मुलांना टॅबचे वाटप केले. गावातील काम करणाऱ्या स्वयंसेविका अलका भोये यांना टॅब वर मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा याची माहिती देण्यात आली. पालकांनाही ह्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. एक स्वयंसेवी संस्था गावात येऊन आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहे याचे पालकांना समाधान वाटले. लागेल ते सहकार्य करण्याचे पालकांनी आश्वासन दिले. वरसविहीर गावचे माजी सरपंच धोंडिराम डगळे यांनी आपली इमारत मुलांच्या या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिली आहे.
क्वेस्ट संस्थेचे अकॅडमीक व्यक्तिमत्व नितीन मराडे, अकॅडमीक व्यवस्थापक सुखदा लोढा, अंबोली आश्रमशाळेच्या शिक्षिका शुभांगी पवार यांनी मुलांना व पालकांना मार्गदर्शन करून टॅबचे वाटप केले. शिक्षक व मुलांसोबत फिल्डवर काम करणाऱ्या शिक्षक मित्रांनी टॅबवर अभ्यास कसा करावा ? टॅब काळजीपूर्वक कसा हाताळावा यासह प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना मार्गदर्शन केले. अंगणवाडीतील मुलांसह गावातील सर्व मुलांसाठी लायब्ररी, भाषा व गणित शिक्षणासाठी मूबलक शैक्षणिक साहित्य असलेले एक कम्युनिटी सेंटर उभं करणार असल्याचं सांगून, अनुपद कार्यक्रमाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र मोरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.