पूर्वी पंढरीला जाणं अनेकांना दुरापास्त होतं. त्यामुळे गावातून देवाला गेलेला परतला की, त्याचं दर्शन घेऊन धन्य झाल्याचे भाव गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटत. मात्र काळ आता बदलला आहे. शेजारचा देवाला काय विदेशातही जाऊन आला तरी शेजाऱ्याला त्याचा थांगपत्ता नसतो. संवाद खुंटला आहे. त्यामुळे अंतरीचा आवाज ऐकण्याची प्रक्रिया लोपत चालली आहे.
वयोरुद्ध जाणकार माणसं काहीतरी कुजबुजत होती पण ते आम्हाला ऐकू येत नव्हतं. काही वेळातच ही माणसं जोरजोराने ओरडायला लागली. आरोळ्या मारायला लागली चला रे, चला रे, आले आले, धावा धावा लवकर चला या आरोळीने गावातील गल्लीबोळातून घराघरातून लहानमोठ्या मुलासह सर्वजण मुंबई महामार्गावरील मोटार अड्ड्यावर पोहोचले. सगळं गाव कसं एक विचारानं, एकजुट झाल्यासारखं वाटलं. ऐनवेळी मुलाबाळांच्या भांडणावरून भांडण करणारी माणसं कशी एकत्रित गप्पागोष्टीत गुंतली होती. आजही तो प्रसंग आठवला म्हणजे मन कसं भरून येतं. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वडाच्या बाभळीच्या सावलीत गावातील भजनी मंडळी टाळ, वीणा, हार्मोनियमवर अभंग म्हणत होती. औचित्य होत पंढरीची यात्रा करून आलेल्यांच्या स्वागताचं.
ही गोष्ट आहे पंधरा-सोळा वर्षा पूर्वीची. ज्यांची परिस्थिती चांगली होती, जवळ थोडाफार पैसा होता अशी पाच सात कुटुंब मिळून नियमित पंढरीला जात असत. गरीबी, लांबचा प्रवास आणि त्यासाठी लागणारी आर्थिक शिदोरी नव्हती. त्यामुळे इच्छा असतांनाही जाऊ न शकणारे ग्रामस्थ आलेल्या यात्रेकरूंच्या दर्शनाने समाधान मानणारे होते. शुद्ध भाव व आत्मीयता असणारी ही माणसं त्याची येण्याची आतुरतेने चातकासारखी वाट पहात होती. यात्रा करून आलेली माणसं कुठल्यातरी वाहनातून उतरत. ।। पंढरीनाथ भगवान की जय ।।अशी एकच गर्जना होताच भजनी मंडळाला स्फुरण येई व तेही मोठमोठ्या आवाजात अभंग गौळणी गात. यात्रेकरूंच्या पिशव्या, बॅग कुणीतरी घाईघाईने उचलून डोक्यावर घेत. यात्रेकरू मग खिशातून बुक्याची डबी काढत. प्रत्येकाला बुक्का लावून प्रत्येकजण बुक्का लावल्यानंतर दर्शन घेई. हीच ती पावलं, हेच ते शरीर, माझ्या पांडुरंगाला भेटून आलंय. हा त्यांचा अंतरीचा स्वच्छ भाव ओसंडून वाहत असे. विविध अभंग, गौळणी गात सर्व गावातून त्यांच्या जणू मिरवणुका काढत. शेवटी यात्रेकरूंच्या घरी आलेल्या ग्रामस्थांना चहापान देत. आणि त्यांना निरोप देत. पण आज काळ बदलला आहे. अनंत प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. दारिद्र्याचे दिवस संपत आहेत. रेल्वे, बस, खाजगी वाहने उपलब्ध झाले आहेत. त्यासाठी लागणारी आर्थिक परिस्थितीही आता सुधारली आहे. जगातील सर्व ठिकाणची माहिती विविध माध्यमातून मिळविणे आता सोपे झाले आहे. तंत्रज्ञानाने आज माणसांची प्रगती झाली आहे. माणसाला माणूस जोडला जात आहे. पण तो माणूस माणसांपासून दूर गेल्याचा भास होतो आहे. शेजारील व्यक्ती जगाच्या कानाकोपऱ्यातून जाऊन येते. चारधाम करून येते पण त्याची कोणाला खबरही नसते. कारण माणूस स्वतःच्या गरजा भागविण्यात पैसा मिळविण्यात आज इतका स्वतःला गुंतून गेला आहे की, त्याचं विशिष्ट भाव विश्व निर्माण करून माणसांपासून दूर गेला आहे.
– श्री. बाप्पा गतीर, रिसोर्स टीचर इगतपुरी
( लेखक पंचायत समिती इगतपुरी येथे रिसोर्स टीचर म्हणून कार्यभार सांभाळतात. )