कवी : प्रकाश पाटील कवठेकर
ग्रामसेवक कोरपगाव, ता. इगतपुरी
संपर्क : 9860702169
शासनाच्या सेवेत दैनंदिन काम करता करता फावल्या वेळात जागतिक दर्जाची चित्रकारिता करणारे व्यक्तिमत्व प्रकाश पाटील कवठेकर हे ओळखले जातात. यासह उत्तमोत्तम कवितांची रचनाही ते करतात. आजची त्यांची कविता सुविचारांची ताकद दाखवून देते.
“युद्ध करायचे असेल
तर कोरोनाशी करा
कोरोना रुग्णांशी नको!!
वैर करायचे असेल
तर रोगाशी करा
रुग्णांशी नको !!
तिरस्कार करायचा असेल
तर कोरोनाचा करा
रुग्णाचा नको!!
द्यायचा असेल तर
मदतीचा हात द्या
दुरावा नको!!
लावायचे असेल तर
घराघरात झाडे लावा
भांडण नको!!
द्यायचा असेल तर
विश्वास,आधार द्या
यातना त्रास नको!!
करायचे असेल तर
अन्नदान करा
अपमान नको!!
द्यायची असेल तर
दुःखात साथ द्या
विश्वास घात नको!!
संघर्ष करायचा असेल
तर मानसिकतेशी करा
माणुसकीशी नको!!
करायचा असेल तर
चांगला विचार करा
दुराचार नको!!
बनायचे असेल तर
सावली बना
वैरी नको!!
करायचे असेल तर
पुण्य करा
पाप नको!!
द्यायचा असेल तर
आत्मविश्वास द्या
भ्रमनिराशा नको!!
भरायचा असेल तर
श्वास भरा
खिसा नको!!
द्यायचा असेल तर
प्रेम, जिव्हाळा द्या
अंतर नको!!
जोडायची असेल तर
माणसं जोडा
पैसा नको!!
तोडायचा असेल तर
दुरावा तोडा
नाती नको!!
करायचे असेल तर
कर्म करा
गर्व नको!!
चालायचे असेल तर
सरळ मार्गाने चाला
गर्दीत नको!!
बघायचा असेल तर
भविष्य काळ बघा
भूतकाळ नको!!
दाखवायची असेल तर
नीती दाखवा
भीती नको!!
बघायचे असेल तर
हृदयात झाकून बघा
घरात वाकून नको!!
बनायचं असेल तर
पाणी बना
विष नको!!
टिकवायची असेल तर
नाती टिकवा
वैर नको!!
टाळायचं असेल तर
मृत्युला टाळा
माणसांना नको!!
कमवायची असेल तर
माणुसकी कमवा
श्रीमंती नको!!
सहभागी व्हायचे असेल
तर दुःखात व्हा
आनंदात नको!!
( कवी प्रकाश पाटील कवठेकर हे इगतपुरी पंचायत समिती अंतर्गत कोरपगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. )