
इगतपुरीनामा न्यूज – प्रत्येक भारतीय सैनिक देशाची सेवा करण्यासाठी घर, नातेवाईकांपासून दूर निघून जातो. देशसेवा हीच ईश्वरसेवा समजून प्रत्येक जण देश उभारणीमध्ये हातभार लावत असतात. त्यामुळे आजी माजी सैनिकांच्या कामासाठी सर्वात प्रथम प्राधान्य देऊ असे प्रतिपादन इगतपुरी पोलीस ठाण्याच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी केले. भारतीय माजी सैनिक संघटना इगतपुरीच्या वतीने पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. मावळते पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांची नागपूर शहर पोलीस ठाण्यात बदली झाली. त्यांनाही संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी भारतीय माजी सैनिक संघटनेचे ज्येष्ठ माजी सैनिक सुकदेव कुकडे, विलास संधान, अध्यक्ष यादव पटेकर, उपाध्यक्ष तुकाराम काजळे, सचिव मनोहर भोसले, खजिनदार भगवान सहाणे, सह खजिनदार ज्ञानेश्वर वारुंगसे, वीरनारी शैला पाचरणे, अर्जुन भांगरे, बाजीराव झनकर आदी आजी माजी सैनिक उपस्थित होते.