
इगतपुरीनामा न्यूज – हभप आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्ट व देहूकर महाराज फड यांच्याद्वारे प्रतिवर्षी महाराष्ट्रातील अतिशय गौरवशाली व सेवाभावी व्यक्तींचा वै. सद्गुरु सोपानकाका महाराज देहूकर यांच्या पुण्यस्मरणार्थ वारकरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. २०२५ चे वारकरी पुरस्कार जाहीर झाले असून सोमवारी ७ जुलैळा श्री देहूकर वाडा, कुंभार घाट, पंढरपूर येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्टचे अध्यक्ष हभप गंगाधर कारभारी जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या पुरस्कारात सद्गुरु वै. हभप सोपानकाका महाराज देहूकर वारकरी पुरस्कार, सांप्रदायिक मृदंग वादक सेवा पुरस्कार, सांप्रदायिक वारकरी भजन सेवा पुरस्कार, देहकर महाराज फड सेवा पुरस्कार या पुरस्कारांचे वितरण देहूकर महाराज फड तथा पंढरपूरचे जेष्ठ अधिकारी हभप श्रीगुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते होणार आहे. श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपुर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संतवीर बंडातात्या महाराज कराडकर, द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, प्रमोद महाराज जगताप (बारामती) राहणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून देहूकर महाराज फड जेष्ठ अधिकारी श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर, संत निवृत्ती महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर अध्यक्ष ॲड. सोमनाथ ज्ञानेश्वर घोटेकर, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाचे श्रद्धेने कार्य करणाऱ्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, फड प्रमुख, दिंडी प्रमुख, महाराज मंडळी उपस्थित राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे. सद्गुरु वै. हभप सोपानकाका महाराज देहूकर वारकरी पुरस्कार हभप गुरुवर्य संदिपन महाराज शिंदे हासेगावकर अध्यक्ष सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांना जाहीर झाला असून ५१ हजार निधी, पोषाख, महावस्त्र, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांप्रदायिक मृदंग वादक सेवा पुरस्कार मृदंग अलंकार गंभीर महाराज अवचार (आळंदी देवाची) सांप्रदायिक वारकरी भजन सेवा पुरस्कार हभप संगीत अलंकार राधाकृष्ण महाराज गरड, गुरुजी (वांगी संस्थान), श्री देहकर महाराज फड सेवा पुरस्कार हभप ज्ञानोबा सदाशीव ढोक यांना पुरस्कार जाहीर झाले असून या पुरस्काराचा निधी रुपये २५ हजार, पोषाख. महावस्त्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.