
इगतपुरीनामा न्यूज – मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीतील आग नियंत्रणात आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नागरिकांसाठी सक्रियतेने काम करीत आहे. परिसरातील नागरिकांनी गाव वगैरे सोडण्याची सध्या आवश्यकता नसून व्यक्तिगत पातळीवर काळजी मात्र घेणे आवश्यक आहे. या प्रकरणी सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. कोणीही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये. नागरिकांनी प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार सूचनांचे पालन करावे. कोणीही सोशल मीडिया आणि व्हॉटस अँपवर खात्री न करता अनधिकृतपणे खोट्या बातम्या आणि अफवा पसरवू नये. नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. नागरिकांच्या पाठीशी शासन यंत्रणा असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार, इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी केले आहे. कोणी अफवा पसरवल्या तर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिला आहे.