
इगतपुरीनामा न्यूज – अनेक धरणे पायथ्याशी असतांना महिलांना हंडाभर पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. पाण्याच्या योजना असूनही नसल्यासारख्या असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडवण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या शेकडो महिला आणि आंदोलक मंत्रालयावर धडक मारायला इगतपुरी रेल्वे स्थानकावर पोहोचले. मात्र पाणी पुरवठा अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेऊन चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी प्रतिनिधीसोबत संवाद साधला. सर्व मागण्याच्या अनुषंगाने सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उद्या बैठक घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. त्यानुसार आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. ह्या बैठकीत समाधान न झाल्यास मंत्रालयावर कोणालाही न सांगता धडक मारून आंदोलन करू असा इशारा भगवान मधे यांनी दिला आहे. इगतपुरी त्र्यंबक तालुक्यात विकासाचा गवगवा करून निवडणुका लढवणारे नेते स्वार्थात मग्न असून त्यांच्या मर्जीतील व्यक्ती आदिवासी लोकांच्या जीवावर मलई खात आहेत असा आरोप यावेळी भगवान मधे यांनी केला आहे. गेल्या काही वर्षात संबंधित लोकप्रतिनिधी फक्त ठराविक व्यक्तींच्या व्यक्तिगत विकासासाठी कार्यरत असल्याने महिलांच्या डोक्यावरचा हंडा त्यांना दिसणार नाही असा टोमणा सुद्धा श्री. मधे यांनी मारला. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या सर्व कामांची चौकशी करावी, योजनेतून वगळलेले आदिवासी पाडे योजनेत समाविष्ट करावे, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या अपूर्ण कामांची चौकशी करून संबधितावर कारवाई करावी, पाणीटंचाईच्या ठिकाणी तात्काळ टँकर सुरु करावेत, वैतरणा धरणातून जलजीवन योजनेसाठी पाणी पुरवठा करावा ह्या एल्गार कष्टकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत. उद्याच्या बैठकीत पाणी टंचाई, जलजीवनचा भ्रष्टाचार, ठेकेदारांना काळया यादीत टाकून कारवाई आदी बाबत विचार केला जाणार आहे.