विद्यार्थ्यांनी उच्चपदस्थ अधिकारी होऊन गाव, समाज आणि आईवडिलांची शान वाढवावी – मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती गोविंदराव सानप : आदर्श गाव मोडाळे येथे विविध शैक्षणिक साहित्य वाटप आणि कामांचे लोकार्पण संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – जननी आणि जन्मभूमीपासून आपण सर्व काही घेत असतो. त्यामुळे त्या ऋणाची उतराई करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्पर्धा परीक्षा जीवनाला सफल करणाऱ्या असून त्याद्वारे यशाचा राजमार्ग मिळवणे महत्वाचे आहे. ह्या कलाटणी देणाऱ्या परीक्षा देतांना आपल्याला मिळालेले अपयश हेच सिद्ध करते की, यशस्वी होण्यासाठी योग्य प्रयत्न आपण केले नाहीत. म्हणूनच यशस्वीतेकडे वाटचाल करायची असेल, तर जगभरातील यशस्वी लोकांचा अभ्यास करा. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. यशस्वी होण्यासाठी त्यांनी काय काम केले किंवा काय मार्ग वापरला याचा बारकाईने अभ्यास करा. जीवनात काम करा किंवा न करा पण त्यांचा अभ्यास नक्की करा त्यांचे मार्ग अवलंबण्याचे प्रयत्न करा. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी व युवकांनी स्वयंशिस्त पाळून समाजाच्या उत्तरदायित्वाची भावना ठेवावी. आगामी काळात उच्चपदस्थ सनदी अधिकारी होऊन गाव, समाज आणि आईवडिलांची शान वाढवावी असे प्रतिपादन मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती गोविंदराव सानप यांनी विद्यार्थी व युवकांना संबोधित करतांना मोडाळे, ता. इगतपुरी येथे केले. गोरख बोडके यांच्या प्रयत्नांनी मोडाळे आणि परिसर समृद्ध होत असून यापुढील काळात सनदी अधिकाऱ्यांची फौज ह्या भागातून राज्याला मिळेल असा गौरव यावेळी त्यांनी केला.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध शैक्षणिक साहित्य वितरण आणि विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट निर्माते मुंबईचे उद्योजक गणपत कोठारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक रोटरी क्लब ऑफ नाशिक नाइन हिल्सचे अध्यक्ष गोरख बोडके यांनी प्रास्ताविक केले. सरपंच शैला आहेर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती गोविंदराव सानप, चित्रपट निर्माते मुंबईचे उद्योजक गणपत कोठारी, रोटरी क्लब ऑफ नाशिक नाइन हिल्सचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेत स्पर्धा परिक्षा पुस्तके वाटप करण्यात आली. विद्यार्थ्यांना मोफत ३५० गणवेश, १०० सायकली, मोबाईल टॅब व मोफत बुटसेट वाटप, विद्यार्थिनींसाठी २ सॅनिटरी पॅड मशिन, शाळेसाठी १० संगणक संच, विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर व वॉटर कुलर, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बँच आणि गावातील ग्रामस्थांना बसण्यासाठी १२ बाकांचे वाटप करण्यात आले. यावेळी युवक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!