काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, त्र्यंबक तालुकाध्यक्ष दिनकर मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करा : इगतपुरी विधानसभेचे काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात इंदिरा काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असतानाही अपक्ष माजी आमदार असणाऱ्या उमेदवाराला प्रदेश काँग्रेस सचिव भास्कर गुंजाळ आणि त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष दिनकर मोरे आदींनी मदत केली. उघडउघडपणे काँग्रेसच्या विरोधात ह्या दोघांनी काम केल्याचे भक्कम पुरावे आहेत. अपक्ष उमेदवाराने यापूर्वी काँग्रेसच्या माध्यमातून दोनदा आमदारकी भोगली. ऐनवेळी त्यांनी त्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला होता. भास्कर गुंजाळ, दिनकर मोरे आदींनी त्यांना विधानसभा निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघात मदत केली. यामुळे काँग्रेस उमेदवाराची हक्काची मते कमी झाली. यामुळे पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून प्रदेश काँग्रेस सचिव भास्कर गुंजाळ, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष दिनकर मोरे आदींवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव यांनी केली आहे. इंदिरा काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांनी भेटून तक्रारीद्वारे मागणी केली. याप्रकरणी सविस्तर चर्चा करून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विषय सखोल समजून घेतला. लवकरच याबाबत निर्णय घेऊन पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा त्यांनी शब्द दिला.

Similar Posts

error: Content is protected !!