
इगतपुरीनामा न्यूज – राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी “क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा” निश्चित केलेला आहे. त्या धर्तीवर क्षेत्रीय शासकिय व निमशासकिय कार्यालयाकरीता आगामी १०० दिवसांमध्ये ७ कलमी कृती आराखडा तयार करून त्या मुद्दयांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यास अनुसरून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे सुविधा पुरविण्याबाबत प्रामुख्याने लक्ष देण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय यांच्या कार्यालयात नागरीकांना त्यांच्या तकारी / अडचणींकरीता समक्ष भेटण्याची वेळ दुपारी ३:३० वा. ते ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. लोकशाही दिनानिमित्त आठवड्याला दर शनिवारी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात तकार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी हजर असलेले संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, तत्सम वरिष्ठ अधिकारी नागरीकांच्या तक्रारीची जागीच दखल घेऊन कार्यवाही व तक्रारीचे निरसन करतील.
जिल्ह्यातील नागरीकांकडून कार्यालय/ पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष अथवा आपले सरकार, पी.जी. पोर्टल, शेतकरी सेल या माध्यमांद्वारे प्राप्त तक्रारींची तात्काळ दखल घेवुन निरसन करण्यात येईल. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळ www.nashikruralpolice.gov.in अद्ययावत करण्यात आले आहे. त्याद्वारे नागरीकांच्या तक्रारीची काटेकोरपणे दखल घेण्यात येईल असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. संकेतस्थळावर जागरूक नागरीकांद्वारे प्राप्त तकारी, अनोळखी मृतदेह, हरविलेल्या व्यक्ती, चोरीस गेलेली व बेवारस वाहने, माहिती अधिकारी, सायबर क्राईम रिपोर्टींग, उत्कृष्ट कामगिरी, ई-तक्रार, पोलीस पडताळणी सेवा, मोबाईल गहाळ फॉर्म याप्रमाणे नागरीकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरीकांना मिळणाऱ्या सेवा जास्तीत जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रचलित कामकाजाच्या पध्दतीचे पुर्नविलोकन, प्रशासकिय कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करून त्या सुलभ पध्दतीने देण्याबाबत कटीबध्द आहोत असे पोलीस दलाने म्हटले आहे.