इगतपुरीनामा न्यूज – अतिदुर्गम भागात वन खात्याच्या सेवेत उच्चतम कामगिरी, वन्यप्राणी व बिबट्याशी कायम झुंजत असूनही सामाजिक कार्याचा वसा जपणारे स्व. गोरक्ष रामदास जाधव यांचे कार्य सर्वांसाठी दिपस्तंभ आहे. वाढदिवसासह कायमच गोरगरीब नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबवण्यात ते कायम सक्रिय असत. कोरोनाच्या काळात लोकांसाठी काम करतांना बाधित होऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजसेवेचे अखंडित काम त्यांचा परिवार करीत आहे. स्व. गोरख जाधव यांच्या स्मृती जपण्यासाठी समाजाचे कल्याण करणाऱ्या जाधव परिवाराचे कौतुक करतो असा सूर अनेक मान्यवरांनी व्यक्त केला. म्हसरूळ येथील आदिवासी आश्रमशाळेत स्व. गोरक्ष जाधव यांच्या जयंतीनिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना ऊबदार सोलापुरी चादर वाटप कार्यक्रम झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रोहीत जाधव, अमित घुगे, अतुल देशपांडे, आशिष वाघ आणि ए. टी. पवार आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. रोहित जाधव आणि मान्यवरांच्या हस्ते चादर वाटप करण्यात आल्या. आगामी काळात सुद्धा स्व. गोरक्ष जाधव यांचा समाजाच्या सेवेचा वारसा जपण्यासाठी बांधील असल्याचे रोहित जाधव यांनी सांगितले.