इगतपुरीनामा न्यूज – सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींपैकी इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. बुधवारी ११ डिसेंबरला राजधानी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ होणार आहे. केंद्रीय मंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात येईल. ५० लाख रुपयांचा हा मानाचा पुरस्कार मोडाळे ग्रामपंचायतीला मिळणार असल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव केला. ग्रामविकासासाठी पुरस्काराची रक्कम वापरता येणार आहे. देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते माझ्या गावाला मिळत असलेल्या पुरस्काराने अतिशय अभिमानास्पद वाटत आहे. माझे ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी गावाची शान देशामध्ये उंचावण्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. ह्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात बुधवारी ११ डिसेंबरला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री, केंद्रीय पंचायती राज मंत्री, विभागाचे सचिव उपस्थित असणार आहे. संयुक्त राष्ट्राने ठरविलेल्या विविध ९ श्रेणीतील सतत विकासाच्या मानकांनुसार स्वच्छ आणि हरित पंचायत म्हणून इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायत पुरस्कारासाठी निवडण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यासह ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात ५० लाख रूपयांची रक्कम थेट जमा करण्यात येईल. मोडाळे गावाचे नाशिक जिल्ह्यात कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group