“ओल्या सुक्या”साठी कार्यकर्त्यांची वारी.. जाते सर्व पक्षांच्या सभेच्या द्वारी : गाडीभाडे, खाणे पिणे अन मजुरीचा खर्च काढण्यासाठी सर्वांचा आटापिटा

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज : विधानसभा निवडणुकीसाठी गावागावात प्रचाराचे रणशिंग चांगलेच जोरात वाजत आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची प्रचारफेऱ्या आणि लोकांच्या भेटीने दमछाक झाली आहे. मतदानाचा दिवस अगदी जवळ आल्याने प्रचारसभांचा मौसम आहे. सभेसाठी येणारे कार्यकर्ते, महिला, युवक यांची लक्षणीय संख्या सामान्य माणसांना आकर्षण वाटत असतात. यावरून कोण उमेदवार निवडून येईल याचा कल मांडला जातो. मात्र इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील काढण्यात येणाऱ्या रॅल्या, प्रचारफेऱ्या, गावभेटी आणि मोठ्या जाहीर सभा यांतील लोकांच्या गर्दीचे सूक्ष्म अवलोकन करता तेच तेच कार्यकर्ते सर्वच पक्षांच्या कार्यक्रमांत दिसून आले आहेत. ओल्या सुक्या पार्टीची सोय, दिवसाची रोख मजुरी, गाडीभाडे, पेट्रोल खर्च काढण्यासाठी ह्या सर्वांची वारी सगळ्या पक्षांच्या दारात उभी ठाकत आहेत. यामुळे नुसती गर्दी पाहून मतदान कोणाला होईल हे आता सांगणे अत्यंत अवघड झाले आहे. या प्रकारातून कार्यकर्त्यांचे चांगलेच हसे होत असल्याने मतदानाचे ससे सापडणे कठीण होणार आहे. 

महाविकास आघाडी, महायुती, मनसे, अन्य पक्ष आणि अपक्ष असे १७ उमेदवार इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब अजमावत आहेत. यासाठी येनकेन प्रकारे कसून प्रयत्न करीत आहेत. सभा, रॅली आणि प्रचारफेरीसाठी कार्यकर्त्यांचा ताफा प्रत्येकाला पाहिजे असतो. यासाठी गावोगावी सर्व पक्षांना “अर्थपूर्ण” सहकार्य करणारे कार्यकर्ते तयार झाले आहेत. कोणत्याही पक्षाची अगदी कुठंही सभा वगैरे असली की हा ताफा एका पायावर तयार असतो. गाडीसाठी खर्च, ओल्या सुक्या पार्टीची जंगी व्यवस्था, मिळणाऱ्या मजुरीचा खर्च काढून घेण्यासाठी ह्या सर्वांची लगबग सुरु असते. यामुळे उमेदवारांच्या व्यवस्थापन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागत आहे. मात्र यामुळे सर्वसामान्य माणसांना ह्या खोट्या कार्यकर्त्यांच्या गर्दीचे “अर्थशास्त्र” चांगले ध्यानात आले आहे. यामुळे सामान्य मतदार सर्व उमेदवारामधून निश्चितच चांगल्या उमेदवाराची निवड करतील असे दिसून येते.

Similar Posts

error: Content is protected !!