
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या १७ नोव्हेंबरला इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लकीभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेत मार्गदर्शन करणार आहेत. इगतपुरीतुन लकीभाऊ जाधव यांना काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी व्यक्तिशः लक्ष घालून उमेदवारी दिलेली असल्याने प्रियंका गांधी यांची तोफ पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यात धडाडणार आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर येथे १७ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता ही अभूतपूर्व प्रचारसभा होईल. यावेळी महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि मित्रपक्षांचे प्रदेश नेते उपस्थित राहणार असल्याचे नियोजन करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे जिल्हाभरातील वरिष्ठ नेतेही प्रचारात उतरणार आहेत, अशी माहिती इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांनी दिली. ह्या सभेसाठी महाविकास आघाडी सूक्ष्मपणे लक्ष घालून काटेकोर नियोजन करीत आहे. ह्या सभेला हजारो नागरिकांचा जनसमुदाय उपस्थित राहील असा अंदाज व्यक्त होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत हे उपस्थित राहतील असा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही प्रचारसभा इगतपुरी मतदारसंघात होणार असल्याची दाट शक्यता आहे. अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सभेमुळे लकीभाऊ जाधव यांचा विजय निश्चित झाला असून सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रियंका गांधी यांच्या सभेपूर्वी महाविकास आघाडीतील बंडखोर व सोबतचे सर्व पदाधिकारी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.