इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर ह्या दोन्ही तालुक्यात या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण ढवळून निघाले. यावेळी बड्या बड्या प्रस्थापित नेत्यांनी अन्य पक्षाचा झेंडा हाती धरला. प्रत्येक राजकीय पक्ष ह्या संक्रमणातून जात आहे. मात्र नेत्यांच्या एकतर्फी कारभारामुळे दबलेले युवक आता पुढे येऊ लागले आहेत. मी म्हणजे पक्ष, मी सांगेल ती पूर्वदिशा असे म्हणणारे जेष्ठ नेते तरुणांना कधीच जवळ करत नव्हते. तरुणही या नावडत्या कारभाराला कंटाळले होते. म्हणून ते जेष्ठ नेत्यांमुळे राजकारणातून बाजूला निघून गेले होते. निवडून आलेल्या आमदारापर्यंत जुनी मंडळी युवकांना जाऊ देत नव्हती. मात्र महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेसने अधिकृत उमेदवारी देतांना महाराष्ट्रातील तरुणांचा बुलंद चेहरा असणारे लकीभाऊ जाधव यांना उमेदवारी दिली. यामुळे जुन्या खोडांनी दाबून ठेवलेल्या युवकांची मोठी फळी बहरण्यासाठी बाहेर पडली आहे. इगतपुरी विधानसभेत लकीभाऊ जाधव हा लढवय्या जवान तरुण आमदार म्हणून पाठवण्यासाठी मतदारसंघातील तरुणवर्ग लक्ष्य ठेवून मैदानात उतरला असल्याचे दिसून येते.
तरुणाईला मिळाले मोकळे मैदान – पक्ष सोडून गेलेल्यांमध्ये जेष्ठ, श्रेष्ठ, पदाची खुर्ची घट्ट ठेवून वर्षानुवर्षे पक्षाचा कारभार करणारी जुनी मंडळी होती. ही माणसं नव्या माणसांना आपल्या पक्षात आणतच नव्हती. उलट आलेल्या युवकांचे येनकेनप्रकारे अवमूल्यन केले जायचे. सत्तेचा मलिदा स्वतःच्या मर्जीने स्वतःलाच मिळवून दिला जायचा. परिणामस्वरूप युवकांची मोठी फळी जुन्या खोडांमुळे दाबली जाऊन राजकारणात बाजूला पडली होती. इंदिरा काँग्रेसने यावेळी लकीभाऊ जाधव यांना तरुणाला लढण्याची संधी दिल्यामुळे आणि जुनी मंडळी अन्य पक्षात गेल्यामुळे नव्या दमाच्या तरुणांनी लकीभाऊ जाधव यांची प्रचारयंत्रणा हाती घेतली आहे. यासह आता तरुणाईच्या हातात पक्षाची सर्व महत्वाची पदे जाणार आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीत युवाशक्तीचा करिष्मा सर्वांना पाहायला मिळणार आहे. आपले राज्य आल्यामुळे लकीभाऊ जाधव यांना निवडून आणण्यासाठी हळूहळू तरुणांची फौज बंधने झूगारून बाहेर पडायला सुरुवात झाली आहे.