भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील मातोश्री हॉस्पिटल म्हणजे दुर्मिळ अतिदुर्मिळ शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारावर उपचार करणारे सर्वोत्तम रुग्णालय म्हणून जिल्हाभर मान्यता पावले आहे. हॉस्पिटलच्या संचालक डॉ. हेमलता चोरडिया, डॉ. जितेंद्र चोरडिया यांच्यातील सेवाभाव आणि जोखीम घेऊन लोकांना वाचवण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. आपले तज्ज्ञ, कुशल डॉक्टर आणि सहकाऱ्यांसह रुग्णांवर उपचाराची प्रभावी पद्धत येथे वापरण्यात येते. सध्या सगळीकडे प्रकाशाचे दिवाळी पर्व सुरु आहे. याच काळात लक्ष्मीपूजन करून घरोघरी आनंदोत्सव साजरा केला जातो. मातोश्री हॉस्पिटलने या लक्ष्मीपूजनाला चिमुकल्या २ वर्षीय “लक्ष्मी” ह्या बालिकेवर दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करून तिला जीवदान मिळवून दिले आहे. हे अनोखे लक्ष्मीपूजन करण्यासाठी मातोश्री हॉस्पिटलचे संचालक, तज्ज्ञ डॉक्टर, हॉस्पिटलचे कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे समजताच सर्वांनी फटाके फोडत जल्लोष केला.
SCT अर्थात सॅक्रोकोसीजील टेराटोमा नावाचा दुर्मिळ ट्यूमर मणक्याजवळ आणि शेजारील हाडाजवळ वाढत असतो. त्यामुळे जीवघेणी गाठ तयार होऊन जीवावर बेतू शकते. आजाराने ग्रस्त व्यक्तीला लघवी आणि संडासला रोज वाढत जाणारा त्रास व वेदना होतात. इगतपुरी तालुक्यातील एका आदिवासी कष्टकरी कुटुंबातील “लक्ष्मी” नावाच्या २ वर्षीय बालिकेला तिचे आईवडील घोटीतील अन्य दवाखान्यात वारंवार उपचारासाठी आणायचे मात्र तात्पुरता फरक दिसायचा. अखेर कंटाळून त्यांनी नामांकित असणाऱ्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये “लक्ष्मी”ला आणले. संचालक डॉ. हेमलता चोरडिया, डॉ. जितेंद्र चोरडिया यांनी तपासणी करून काही चाचण्या करून घेतल्या. त्यामध्ये लक्ष्मी ही चिमुकली दुर्मिळ सॅक्रोकोसीजील टेराटोमा ह्याने ग्रस्त असल्याचे निदान केले. एवढ्या लहान बालिकेवर अवघड शस्त्रक्रिया अत्यावश्यक असल्याचे त्यांनी पालकांना समजून सांगितले. त्यानुसार तिच्या पालकांनी डोळे झाकून मातोश्री हॉस्पिटलवर आम्ही विश्वास ठेवतो. या आजारावर आपण जे काही उपचार शस्त्रक्रिया कराल ते आम्हाला मान्य असेल असे सांगितले.
लक्ष्मी ह्या बालिकेवरील ही दुर्मिळ शस्त्रक्रिया योगायोगाने लक्ष्मीपूजनाच्या पर्वावर यशस्वीरित्या पार पडली. नामांकित शल्यविशारद डॉ. अनिता गांगुर्डे, भुलतज्ज्ञ डॉ. प्रदीप इंगोले, हॉस्पिटलच्या संचालक डॉ. हेमलता चोरडिया, डॉ. जितेंद्र चोरडिया, नर्सिंग स्टाफ मनीषा शिंदे, विनोद बल्लाळ, नामदेब खाडे, निशा खाडे, रेणुका, मातोश्री पॅथॉलॉजीचे संचालक हरीश मुंगसे, औषधपुरवठा कुमार चोरडिया या सर्वांनी प्रचंड मेहनत घेऊन “लक्ष्मीला” नवा जन्म मिळवून दिला. ऑपेरेशनची भीती घालवण्यासाठी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी रामदास गव्हाणे यांनी उत्तम समुपदेशन केले. विशेष म्हणजे “लक्ष्मीच्या” रक्तातील आवश्यक घटकाचे प्रमाण फक्त ६.५ असल्याने ३ रक्तपिशव्या पाहिजे होत्या. मात्र नाशिकमध्ये कोणत्याही ब्लड बँकेत ए पॉझिटिव्ह रक्त उपलब्ध नव्हते. मातोश्री पॅथॉलॉजीचे संचालक हरीश मुंगसे यांचे स्वतःचे रक्त ए पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यासह एकाचे तात्काळ रक्तदान करून रक्त उपलब्ध केले. बालिकेवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने ह्या सर्वांनी खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन करून बालिकेला पुनर्जन्म दिला. याबद्दल सर्वांचे इगतपुरी तालुका आणि जिल्हाभरात कौतुक केले जात आहे.